भिवंडीतील उड्डाण पुलावरील हाईट बॅरिकेट ठरतात अपघाताला कारणीभूत ; दोन दिवसात दोन वाहनांची धडक
By नितीन पंडित | Published: February 15, 2024 04:37 PM2024-02-15T16:37:42+5:302024-02-15T16:38:53+5:30
शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुल व व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर अवजड वाहनांना बंदी आहे.
नितीन पंडित, भिवंडी: शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुल व व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर अवजड वाहनांना बंदी आहे. त्यासाठी या दोन्ही मुख्य रस्त्यांवरील उड्डाणपूलांवर हाईट बॅरिकेट लावण्यात आले आहेत.परंतु रात्रीच्या अंधारात अथवा पहाटेच्या वेळी हे हाईट बॅरिकेट दिसून येत नसल्याने अनेक वेळा वाहनांची धडक बसल्याच्या दुर्घटना घडल्या असतानाच स्वर्गीय राजीव गांधी पुलावरा रामेश्वर मंदिरा कडील बाजूस लावलेल्या हाईट बॅरिकेटिंगला सतत दोन दिवसात दोन अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने लोखंडी बॅरिकेट कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बुधवारी पहाटे वाहनाने धडक दिल्याने संपूर्ण बॅरिकेटिंग कोसळली होती त्यानंतर तात्पुरते बांबू बांधून काम सुरू ठेवले होते व सायंकाळी पुन्हा बॅरिकेटिंग वेल्डिंग करून लावण्यात आले पण गुरुवारी पहाटे पुन्हा एका अज्ञात वाहनाने धडक देण्याची घटना घडली आहे.
या उड्डाण पुलावरील हाईट बॅरिकेटिंगला यापूर्वी अनेक वेळा वाहनांनी धडक दिल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यानंतर ही पालिका प्रशासन व वाहतूक पोलीस यांनी या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. हाईट बॅरिकेटिंग असलेल्या ठिकाणी दिवस रात्र सुरू राहणारी रेड लाईट व रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे जेणे करून नवीन वाहन चालकाच्या लक्षात या रस्त्यावरील हाईट बॅरिकेटिंग येतील परंतु ती काळजी प्रशासनाने कधीही घेतली नसल्याने हे अपघात होत असून या ठिकाणी कोणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरीक विचारीत आहेत.