विटावा सबवेच्या रस्त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पालिका घेणार आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:34 PM2017-12-27T15:34:41+5:302017-12-27T15:38:37+5:30
विटावा सबवेखालील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्याबाबत तोडगा काढण्यासाठी पालिका आता आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत घेणार आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात यावर अंतिम तोडगा काढण्याची रुपरेषा ठरविली जाणार आहे.
ठाणे - दुरु स्तीसाठी मागील चार दिवसापासून बंद असलेला विटावा सब वे मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र हा सबवे खुला होताच बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. परंतु हा केवळ तात्पुरता प्रयोग करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यावर अंतिम सोल्युशन काय करता येऊ शकते, यासाठी आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्याकडून आलेल्या अहवालानंतरच पुढील दिशा ठरविली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले. परंतु याठिकाणी पाणी मुरतेय कुठून याचाही अभ्यास केला जाणार आहे.
चार दिवसाचा ब्लॉक घेऊन विटावा सबवेची दुरु स्ती करण्यात आली. मात्र सिमेंट काँक्र ीटीकरण न करता या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढत हा मार्ग चार दिवसांसाठी बंद करून दुरु स्तीचे काम पालिकेमार्फत सुरु होते. या ठिकाणी पाणी साचत असल्याने या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे होतात. कायम अवजड आणि लहान मोठ्या वाहनांची वाहतूक या ठिकाणी सुरूच राहत असल्यामुळे या ठिकाणी दुरु स्ती साठी रस्ता बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. हे काम महानगर पालिकेने सुरु केले आणि मंगळवारी काम संपवून सबवे सकाळी सहा वाजता वाहतुकीसाठी सुरु केला. मात्र काही वेळेतच पेव्हरब्लॉक उखडले गेले, आणि हा रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. सध्या येथील वाहतुक सुरु असली तरी यावर आता अंतिम सोल्युशन काढण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत सुरु झाला आहे. प्रायोगिक तत्वावर येथे पेव्हर ब्लॉक लावण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
दरम्यान आता यावर अंतिम सोल्युशन काढण्यासाठी आयआयटीची मदत घेतली जाणार आहे. तसेच सिमेंट कंपन्यांना देखील बोलविण्यात येऊन या भागाची पाहणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आयआयटीचा सर्व्हे आणि सिमेंट कंपन्या या ठिकाणी कोणता पर्याय योग्य ठरु शकतो, याची सांगड घालून पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. परंतु याठिकाणी पाणी कुठुन साचते हा मोठा प्रश्न पालिकेला सतावत आहे. पूर्वी पावसाळ्याच्या काळातच पाणी साचत होते. परंतु आता १२ महिने या ठिकाणी पाणी साचत असल्याने ते कुठुन येते याची माहिती पालिकेला अद्याप झालेली नाही.
- या बाबत भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी काही प्रश्न पालिकेला उपस्थित केले असून त्याची उत्तरे आता पालिका देणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. पुलाच्या आसपास पाण्याचे झरे आहेत हि बाब पालिकेला व सल्लागारांना माहिती नव्हती का ?, पेव्हरब्लॉक बसविण्याचा सल्ला कोणत्या महान सल्लागारांनी दिला आणि या चुकीच्या सल्ल्याबद्दल त्यांना दिलेली फी परत घेण्यात येईल काय किंवा फी दिली नसल्यास देणार नाही अशी खात्री ठाणेकरांना मिळेल काय?, ज्या ठेकेदाराने काम केले ते निविदा काढून नियमाप्रमाणे देण्यात आले होते का, निविदा काढून काम झाले असल्यास निविदेतील अटी व शर्ती, पेव्हरब्लॉक च्या खाली जरूर असलेले सोलींग, ६ इंच पीसीसी, पेव्हरब्लॉक च्या खाली पावडर ( ग्रीट ) चा थर आवश्यक तेवढ्याच जाडीचा होता का, पेव्हरब्लॉक ची स्ट्रेन्थ किती ठरविण्यात आली होती, सल्लागारांनी हि सर्व स्पेफीकेशन दिली होती का कि फक्त पेव्हर ब्लॉक लावण्याचा सल्ला दिला होता यासह आणखी काही सवाल उपस्थित केले असून याची उत्तर पालिकेने द्यावीत अशी मागणी केली आहे.