रवी पुजारीची वसुलीसाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:35 AM2018-06-27T05:35:15+5:302018-06-27T05:35:36+5:30
क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची आपण वेळोवेळी मदत घेतल्याची कबुली, या प्रकरणातील आरोपी सोनू जालानने पोलिसांना दिली आहे
ठाणे : क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची आपण वेळोवेळी मदत घेतल्याची कबुली, या प्रकरणातील आरोपी सोनू जालानने पोलिसांना दिली आहे. ही माहिती पोलिसांकडून पडताळली जात आहे.
क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळणाºया आठ आरोपींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. मालाड येथील आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कुख्यात गँगस्टर रवी पुजारी टोळी सहभागी असल्याचे उघड झाल्याने, पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वयेदेखील (मकोका) गुन्हे दाखल केले होते. मकोकांतर्गत १९ जून रोजी विशेष मकोका न्यायालयाने सोनू जालानला २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आणि खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
मकोकाच्या कलम १८ अंतर्गत पोलिसांनी सोनू जालानचा कबुलीजबाब नोंदविला होता. सोनूकडे बरेचसे ग्राहक नियमित सट्टा लावायचे. या ग्राहकांमध्ये बॉलीवूडमधील अनेक नामांकित व्यक्तिंचाही सहभाग समोर आला आहे. सोनू त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करायचा. अभिनेता अरबाज खानवर त्याने अशाच प्रकारे १.७५ कोटी रुपयांची वसुली काढली होती. त्या वेळी अरबाजसोबत सोनूचा वादही झाला होता. कालांतराने त्यांच्यातील वाद संपुष्टात आला. मात्र, काही प्रकरणांमध्ये सोनूने सांगितलेली रक्कम देण्यास ग्राहकांनी नकार दिला. त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यासाठी कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची मदत घेतल्याचे सोनूने कबुलीजबाबामध्ये सांगितले. त्याने दिलेली माहिती पडताळण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.