सोशल मीडियामुळे दुभंगणारे संसार जोडणार, महापालिका करणार नऊ लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:55 AM2018-06-15T04:55:36+5:302018-06-15T04:55:36+5:30
सध्या सोशल मीडियामुळे जग हायटेक बनू पाहतेय. परंतु, याच सोशल मीडियाचे वाईट परिणामही दिसून आले आहेत. यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद होऊन प्रकरणे काडीमोडपर्यंत येऊन पोहोचली असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
ठाणे - सध्या सोशल मीडियामुळे जग हायटेक बनू पाहतेय. परंतु, याच सोशल मीडियाचे वाईट परिणामही दिसून आले आहेत. यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद होऊन प्रकरणे काडीमोडपर्यंत येऊन पोहोचली असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. किंबहुना, पतीपत्नीमध्ये भांडण होणे हेदेखील नित्याचेच होऊ लागले आहे. त्यामुळेच ठाणे महापालिकेने पतीपत्नीमधील ही भांडणे सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने कुटुंबसौख्य ही योजना पुढे आणली आहे.
सध्या घटस्फोटांचे प्रमाण हे नवीन जोडप्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून आले आहे. त्यामध्ये सोशल मीडियामुळे होणाऱ्या घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. याच सोशल मीडियाच्या अधिकच्या वापरामुळे पतीपत्नीमधील संवादही कमी होऊ लागले आहेत. त्यांचे संभाषणदेखील आता याच माध्यमातून होताना दिसत आहे. परंतु, याचे दुष्परिणामही दिसून आले आहेत.
या भांडणातून ९० टक्के जोडपी जरी पुन्हा एक होत असली तरीदेखील १० टक्के जोडप्यांमध्ये भांडणाचे परिणाम घटस्फोटापर्यंत जाताना दिसतात. दोघे जण एकमेकांमधील चुकाच काढण्यात धन्यता मानत असतात. त्यामुळे त्यांना काउन्सिलिंग करण्याचे काम पालिकेने हाती घेण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी ‘कुटुंबसौख्य’ ही योजना पुढे आणली आहे. तिच्या माध्यमातून दाम्पत्यामधील तंटा सोडवण्याचे काम काउन्सिलिंगच्या माध्यमातून केले जाणार आहे.
एका जोडप्याचे साधारणपणे सहा वेळा काउन्सिलिंग केले जाणार आहे, अशी योजना राबवणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रत्येक काउन्सिलिंगसाठी साधारणपणे ५०० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला असून वर्षाला ३०० जोडप्यांचे काउन्सिलिंग करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.