ठाणे पोलिसांच्या मदतीने साडेचार लाखांची रक्कम मिळाली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 07:42 PM2018-05-20T19:42:01+5:302018-05-20T19:42:01+5:30
व्यवसाय वृद्धीसाठी तीन मित्रांकडून उसनवारीने घेतलेले दहा लाख रुपये एका व्यावसायिकाने परत केले नव्हते. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार आल्यानंतर यातील साडे चार लाख रुपये त्याने अखेर परत केले.
ठाणे : व्यवसायात तोटा आल्याच्या नावाखाली व्यापारी मित्रांचे उसनवार घेतलेले पैसे परत न करणा-या प्रकाश करिअप्पा (५३, रा. पाचपाखाडी, ठाणे) याने अखेर १० लाखांपैकी साडेचार लाखांची रक्कम परत केली. केवळ एका तक्रार अर्जाची दखल घेऊन पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही रक्कम परत मिळाल्यामुळे व्यापा-यांनी समाधान व्यक्त केले.
पाचपाखाडीतील ड्रायफ्रूटचे व्यावसायिक करिअप्पा यांनी आपल्या व्यवसायवृद्धीसाठी राजेंद्र कांबळे, महेश परमार आणि प्रशांत जोशी या पाचपाखाडीतील त्यांच्या मित्रांकडून १० लाखांची रक्कम घेतली. यातील कांबळे याने आॅक्टोबर २०१७ मध्ये सात लाख ८० हजार, तर महेशने ९६ हजार आणि प्रशांतने एक लाख ६४ हजारांची रक्कम तीन महिन्यांमध्ये परत करण्याच्या बोलीवर दिली होती. हे तिघेही प्रकाशचे मित्र आणि शेजारी असल्यामुळे त्यांनी हे पैसे त्याच्या व्यवसायात गुंतवले. तीन ते चार महिन्यांनंतर या तिघांनीही त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावल्यानंतर तो टोलवाटोलवी करत होता. व्यवसायात नुकसान झाल्याच्या नावाखाली त्याने हे पैसे परत केले नव्हते. अखेर, या तिघांनीही फेब्रुवारी २०१८ मध्ये याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात उसनवारीने घेतलेले पैसे परत न केल्याबाबत त्याच्याविरुद्ध तक्रार अर्ज केला. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने याबाबत वारंवार पाठपुरावा केला. तेव्हा प्रकाशने यातील साडेचार लाखांची रक्कम कांबळे यांच्यासह तिघांनाही पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी दिली. उर्वरित रक्कमही लवकरच देण्याचे त्याने मान्य केले. कोणताही गुन्हा दाखल न करताच केवळ तक्रार अर्जावर पोलिसांनी ही रक्कम मिळवून दिल्याबद्दल कांबळे, परमार आणि जोशी या तिघांनीही पोलिसांचे आभार मानले.