अनोळखी व्यक्तीची मदत करणं वृद्धेला भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 05:48 PM2023-02-05T17:48:30+5:302023-02-05T17:49:59+5:30
मीरारोड - दोन अनोळखी व्यक्तींनी रेल्वे स्थानकांकडे जाण्यास पैसे नाही सांगितल्याने मदतीसाठी धावलेल्या वृद्धेलाच त्या दोन भामट्यांनी ८० हजारांना ...
मीरारोड - दोन अनोळखी व्यक्तींनी रेल्वे स्थानकांकडे जाण्यास पैसे नाही सांगितल्याने मदतीसाठी धावलेल्या वृद्धेलाच त्या दोन भामट्यांनी ८० हजारांना फसवल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे.
भाईंदर पश्चिमेच्या पोद्दार शाळे समोर शिवमहिमा इमारतीत राहणाऱ्या ७२ वर्षीय सरस्वती गुप्ता ह्या शुक्रवारी दुपारी मुलाला त्याच्या पानाच्या दुकानावर जेवणाचा डबा देऊन परत येत होत्या. त्यावेळी दोघे अनोळखी इसम त्यांना भेटले व आम्ही बिहारी आहोत. आम्हाला कामावरून काढून टाकल्याने पैसे नाहीत. आम्हाला रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षात सोडा अशी विनवणी केली.
दया आलेल्या सरस्वती यांनी त्यांना रिक्षात बसवले व खान पीव्हीसी दुकानासमोर सोडले. खाली उतरल्यावर त्या दोघांनी सरस्वती यांना त्यांचे मंगळसूत्र व कानातले चोरीला जातील असे घाबरवले. त्यावर सरस्वती यांनी एका इसमाने दिलेल्या रुमालात सोन्याचे गाडीने काढून ठेवले. ते दोघेही इसम निघून गेल्यानंतर रुमाल उघडून पहिला असता त्यात दागिन्यांच्या ऐवजी दगड होते. या प्रकरणी ८० हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा भाईंदर पोलिसांनी दाखल करून तपास सुरु केला आहे.