न्याय मिळवून देणाऱ्यां उपोषणकर्त्याच्या मतांशी मुलीसह तिचे आईवडील असहमत
By सुरेश लोखंडे | Published: December 23, 2017 08:24 PM2017-12-23T20:24:58+5:302017-12-23T20:26:07+5:30
जयस्वाल यांनी अल्पवयीन मुलीला कामावर ठेवल्याचा आरोप कर्णिक यांनी केला होता. गेले काही दिवस ही मुलगी व तिचे कुटुंबीय परागंदा असल्याचे कर्णिक सांगत होते. मात्र शनिवारी त्या मुलीचे आई-वडिल उपोषणस्थळी हजर झाले व त्यांनी कर्णिकांच्या दाव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याच्या मागणीकरिता उपोषणाला बसलेल्या विक्रांत कर्णिक यांच्या दाव्याशी आपण सहमत नसल्याचा दावा जयस्वाल यांच्याकडे कामावर असलेल्या त्या मुलीच्या आई-वडिलांनी शनिवारी केला. मात्र तरीही आपण आपल्या आरोपांवर व चौकशीच्या मागणीवर ठाम असल्याचे कर्णिक यांनी सांगितले. आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी जयस्वाल यांनी यापूर्वीच केली आहे.
ठाणे मतदाता जागरण अभियान व धर्मराज्य पक्षांसह अन्य सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभल्याने कर्णिक हे शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जयस्वाल यांनी अल्पवयीन मुलीला कामावर ठेवल्याचा आरोप कर्णिक यांनी केला होता. गेले काही दिवस ही मुलगी व तिचे कुटुंबीय परागंदा असल्याचे कर्णिक सांगत होते. मात्र शनिवारी त्या मुलीचे आई-वडिल उपोषणस्थळी हजर झाले व त्यांनी कर्णिकांच्या दाव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. मुलीला कामावरून काढल्यानंतर तिला पुन्हा कामावर येण्यासाठी आयुक्तांच्या बंगल्यावरून तीन दिवस सतत फोन येत असल्याचे कर्णिक यांनी म्हटले असले तरी तिच्या आईने त्याचा साफ इन्कार केला. मात्र अल्पवयीन मुलगी कामाला ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे कर्णिक यांनी सांगितले. गुजरातहून मुलीला तिच्या आईवडिलासह उपोषणस्थळी उपस्थित करण्यामागे षडयंत्र असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच संबंधीत अल्पवयीन मुलीचे घरही तोडण्यात आल्याचा आरोपही कर्णिक यांनी केला.
आपली मुलगी १६ वर्षाची असल्याचे तिच्या वडीलांकडून सांगण्यात आले. ती नेपाळमधील आचमा मारगू येथील शाळेत पाचवीपर्यंत शिकलेली आहे. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही. घर तोडल्यामुळे आम्ही दादरला वडिलांकडे गेलो आणि तेथून सुरतला गेलो. आमच्यावरील कथित अन्यायाविरुद्ध कुणीतरी उपोषण करीत केल्याचे कळल्यामुळे आम्ही येथे आलो. पण आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नसल्याचे संबंधीत मुलीचे वडील सुरेश परिवार यांनी स्पष्ट केले आहे. या परिवाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.