हेरॉइनची तस्करी : ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना, आणखी दोघांची धरपकड करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 11:11 PM2017-10-13T23:11:19+5:302017-10-13T23:11:44+5:30
हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर त्याला हा माल पुरवणा-या मध्य प्रदेशातील गनी माऊ याच्यासह दोघांच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे.
ठाणे : हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर त्याला हा माल पुरवणा-या मध्य प्रदेशातील गनी माऊ याच्यासह दोघांच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे. या दोघांकडून आणखी बरीच माहिती मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
अन्सारी याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी स्थानक परिसरात बुधवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून ३९ लाख २५ हजारांचे ३९२.५ ग्रॅम इतके हेरॉइन हस्तगत करण्यात आले. त्याने हा माल मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामाऊ परिसरातील गनी माऊ याच्याकडून आणल्याची कबुली दिली. ही माहिती मिळताच गोडसे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, उपनिरीक्षक धर्मराज बांगर, चंद्रकांत घाडगे आदींचे पथक गुरुवारी मध्य प्रदेशमध्ये रवाना झाले. शुक्रवारी या पथकाने मंदसौर पोलिसांची मदत घेऊन गनी माऊ याच्या घराचा शोध घेतला. मात्र, तो घरी आलेला नव्हता. त्याच्यासह आणखी दोघांचा या भागातून शोध घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२५ लाखांमध्ये किलोचा ‘सौदा’
आंतरराष्टÑीय बाजारपेठेत किलोमागे करोडोंची किंमत असलेल्या या हेरॉइनची मध्य प्रदेशात मात्र किलोमागे अवघ्या २० ते २५ लाखांमध्ये घाऊक विक्री केली जात होती. २५ लाखांमध्ये एक किलो मिळालेल्या या हेरॉइनची पुढे अगदी ग्रॅममध्ये लाखाचा भाव लावून गनी माऊ आणि त्याचे साथीदार सोनू अन्सारी यासारख्या किरकोळ विक्रेत्याला त्याची विक्री करत होते. यात आणखी कोणती टोळी आहे, याचा तपास करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.