आला पाऊस... आला पाऊस... ठाणेकरांच्या अंगणात
By admin | Published: May 30, 2017 05:50 AM2017-05-30T05:50:49+5:302017-05-30T05:50:49+5:30
उन्हाच्या काहिलीने अंगाची लाहीलाही झाल्याने ठाणेकर चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना आठवडाभरात पहिला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उन्हाच्या काहिलीने अंगाची लाहीलाही झाल्याने ठाणेकर चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना आठवडाभरात पहिला पाऊस कोसळणार असल्याचे संकेत पक्ष्यांनी द्यायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर यंदा पाऊस दमदार होणार असल्याचेही संकेत प्राप्त होत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.
पावसाळा जवळ येऊन ठेपला असल्याचेच संकेत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण देत आहे. त्यामुळे घामाच्या धारा वाढल्या असून उकाड्याने प्रत्येकजण हैराण झाला आहे. केरळची वेस ओलांडून जलधारा महाराष्ट्रात कधी कोसळणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पक्ष्यांच्या संकेतावर पक्षी अभ्यासक पावसाचा अंदाज बांधतात.
काही पक्ष्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे संकेत द्यायला सुरुवात केली आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या पावसाची सर ही ७ ते १० जूनदरम्यान येते. परंतु, यंदा पावसाच्या सरी सात ते दहा दिवस अगोदरच म्हणजेच आठवडाभराच्या आत कोसळतील. त्यानंतर, एक ते दोन दिवसांची विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा जोर पकडेल, असा अंदाज पक्षी अभ्यासक चैतन्य कीर यांनी वर्तवला आहे.
पक्ष्यांच्या घरट्यांवरून पावसाच्या प्रमाणाचा अंदाज लावला जातो. कावळ्याने २० फुटांपेक्षा कमी उंचीवर घरटी बांधली असतील, तर अल्प प्रमाणात पाऊस, २० फुटांपेक्षा अधिक उंचीवर घरटे बांधले असेल, तर अधिक पावसाची शक्यता असते. यंदा कावळ्याची घरटी ही २० ते २५ फुटांवर आढळून आली आहेत. त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी समाधानकारक असल्याचा दावा कीर यांनी केला आहे. काही पक्षी पावसाळ्यात बाहेरील राज्यांतून मुंबईकडे येतात. उदा. नारिंगी डोक्याचा कस्तुर (आॅरेंज हेडेड ब्राऊन थ्रश), नवरंग, नाचणपक्षी. हे पक्षी ठाणे व मुंबई परिसरात दिसू लागले आहेत. चातक पक्षी हा पाऊस पडण्याच्या सात ते दहा दिवस अगोदर मुंबईकडे येतो. हा पक्षी ठाण्यातील नागला बंदरावर सात दिवसांपूर्वी आढळल्याचे पक्षी निरीक्षक अपूर्वा पाटील हिने सांगितले.
साळुंखी व कबुतर हे मुसळधार पाऊस पडण्याच्या आधी इमारत किंवा एखाद्या झाडाच्या आडोशाला घोळक्याने दडून बसतात. सलग एक दिवसापेक्षा अधिक पाऊस पडणार असेल तर सर्वच पक्ष्यांची आधी खाण्याची वेळ बदलते. एरव्ही, सूर्यास्तापर्यंत खाणारे पक्षी सतत पडणाऱ्या पावसाच्या आधी सूर्यास्तानंतरही खाताना निदर्शनास पडतात. यावरून सतत पडणाऱ्या पावसाचा अंदाज बांधता येतो. घार व इतर शिकारी पक्षी हे जेव्हा पावसाळी ढगांच्या वर जातात आणि त्यांचे पंख इंचभर नजरेस पडतात, त्यावरून तासाभरात पाऊस पडायला सुरुवात होते, असा अंदाज बांधला जातो. खाडीकिनारी आढळणारे पक्षी नदीच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने वेगाने उडायला लागले की, वादळी पावसाची शक्यता असते.