उल्हासनगरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, एकाच वेळी १५ जणांना चावा
By सदानंद नाईक | Published: March 5, 2022 03:22 PM2022-03-05T15:22:34+5:302022-03-05T15:22:53+5:30
महिन्याला ६०० पेक्षा जास्त कुत्रा चावल्याच्या घटना
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून शुक्रवारी सुभाष टेकडी परिसरात एका कुत्र्याने १५ पेक्षा जास्त जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. अखेर शनिवारी कुत्र्यांच्या भांडणात चावा घेणाऱ्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
उल्हासनगरात भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून नागरिक रात्रीचे १० वाजल्यानंतर बाहेर पडू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. शुक्रवारी सकाळ पासून रात्री पर्यंत एका कुत्र्याने १५ पेक्षा जास्त जणांचा चावा घेतला. याप्रकारने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कुत्र्याने चावा घेतलेल्या सर्वांनी खाजगी रुग्णालयसह शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. स्थानिक नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. शनिवारी सकाळी चावा घेतलेल्या कुत्र्यावर इतर कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात त्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांची भेट घेऊन भटक्या कुत्र्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरातील मध्यवर्ती रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी ३० तर महिन्याला ७०० पेक्षा जास्त कुत्रा चावल्याच्या घटनेची नोंद होत आहे, अशी माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. तर महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक जाधव यांनी गेल्या तीन वर्षांपासून श्वानाचे नसबंदीकरण करण्यासाठी निविदा व फेरनिविदा काढीत असल्याची माहिती दिली. मात्र ठेकेदार मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुन्हा शॉर्टटर्मसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून कुत्र्याच्या नसबंदीकरण केंद्राचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. एका महिन्यात केंद्राचे नूतनीकरण होणार असल्याचा विश्वास उपायुक्त जाधव यांनी व्यक्त करून कुत्र्यांचे नसबंदीकरण सुरू होण्याचे संकेत दिले.
रात्री १० नंतर अघोषित संचारबंदी?
शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने, कुत्रा चावा घेल्याच्या घटनेत वाढ झाली. कुत्र्यांच्या भीतीने लहान मुलांसह नागरिक रात्रीचे १० नंतर घरा बाहेर पडण्यास भीत आहेत, एवढी दहशत भटक्या कुत्र्याची शहरात निर्माण झाली. महापालिकेने भटक्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावी. अशा मागणीने शहरात जोर धरला आहे.