महाविद्यालयांसमोर रोडरोमिओंचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:40 PM2020-02-19T23:40:33+5:302020-02-19T23:40:40+5:30
भाजपचे पोलिसांना निवेदन : कडक कारवाई करण्याची मागणी, उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढली
उल्हासनगर : शहरातील पालिकेच्या शाळेसमोर उभे राहून मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंविरोधात कारवाई करण्याचे निवेदन भाजप शिष्टमंडळाने उल्हासनगर पोलिसांना मंगळवारी दिले. यापूर्वी शहरातील गुन्हेगारीबाबतही पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्याची माहिती राजेश वधारिया यांनी दिली.
उल्हासनगरात गुन्हेगारी वाढली असून, याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना निवेदनाद्वारे केली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना साकडे घालून गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले. गुन्हेगारी व अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आता नागरिकांसमोर वेगळाच प्रश्न उभा ठाकला आहे. पालिकेच्या शाळा प्रवेशद्वारासमोर रोडरोमिओंचा अड्डा असून मुलींना छेडण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. मुलींच्या पालकांनी विरोध केल्यास त्यांना मारहाण करण्याचेही प्रकार घडल्याचा आरोप भाजप नेते आणि स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी करत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांच्याकडे केली. गेल्या आठवड्यात रिक्षाने जाणाºया कॉलेज तरुणीची छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. याशिवाय, आरकेटी कॉलेजच्या एका मुलीला सपना गार्डनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यात अडवून तिची छेड काढली होती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कारवाई न झाल्याने मुलींच्या वडिलांनी हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला असता, शिवसेनेने मुलीला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. कॉलेज, शाळा परिसर तसेच उल्हासनगर, शहाड व विठ्ठलवाडी रेल्वेस्टेशन परिसरात हे प्रकार होत आहेत. याला आळा घालण्याची मागणी सर्वस्तरातूंन होत आहे. चायनीज खाद्यपदार्थविक्रेते गावठी दारू पिण्यास सर्रास परवानगी दिली जात असल्याचा आरोपही वधारिया यांनी निवेदनात केला.
पोलीस बंदोबस्ताची मागणी
शाळा व महाविद्यालयांसमोर रोडरोमिओंची दादागिरी आणि मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे. रोडरोमिओंचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत.