भाईंदरच्या २० % पोलिसांना उच्च रक्तदाब
By Admin | Published: July 13, 2016 01:36 AM2016-07-13T01:36:56+5:302016-07-13T01:36:56+5:30
मोर्चा, आंदोलन, सण, बंदोबस्त यामुळे १२ ते २४ तास आॅनड्युटी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २० टक्के
भार्इंदर : मोर्चा, आंदोलन, सण, बंदोबस्त यामुळे १२ ते २४ तास आॅनड्युटी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असल्याचे २०१६ च्या सर्र्वेक्षणातून पुढे आले आहे. तसेच २००२ पासून या विकारांसह मधुमेह, दमा, मूत्रपिंड व फुप्फुसाच्या आजाराने दरवर्षी ११० हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाने पोलिसांसाठी घेतलेल्या आरोग्य शिबिरात हे उघड झाले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी न घेणाऱ्या पोलिसांचे आरोग्य स्पर्धेच्या व धावपळीच्या जगात धोक्यात असल्याचे वरील माहितीवरून स्पष्ट झाले. ड्युटीवर असताना अथवा ड्युटीवरून घरी परतत असताना आपल्या सहकाऱ्याला किंवा एखाद्या नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्यास त्या वेळी करायचे प्रथमोपचार तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी काय करावे, यासाठी पोलिसांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे वेळीच प्रथमोपचार मिळाल्याने पीडित रुग्णाचे प्राण वाचवल्यामुळे त्याला प्रभावी उपचार मिळण्याची शक्यता निर्माण होते. या विकारापासून दूर राहण्यासाठी दररोज व्यायाम, समतोल आहार, वेळेत आणि पुरेशी झोप आवश्यक असल्याचा सल्ला शिबिरातील डॉक्टरांकडून देण्यात आला. या वेळी रुग्णालयाचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी म्हणाले, पोलिसांना जडत असलेल्या विविध विकारांमागे त्यांना मिळणारी अपुरी झोप, रोजच्या खाण्यात व वेळेत बदल, कामाचा वाढता ताण असल्याने त्यांच्या शरीरात अपचन, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे विकार होतात. मधुमेह व उच्च रक्तदाबामुळेच अनेकदा हृदयविकाराचा, डोळ्यांचा व पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)