उंच माझा खोका

By admin | Published: May 7, 2016 12:44 AM2016-05-07T00:44:36+5:302016-05-07T00:44:36+5:30

विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी याकरिता इच्छुकांनी खोक्यांवर खोके रचले आहेत.

High my dig | उंच माझा खोका

उंच माझा खोका

Next

- नारायण जाधव ल्ल ठाणे

विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी याकरिता इच्छुकांनी खोक्यांवर खोके रचले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला तर घोडेबाजार अटळ आहे.
येत्या ३ जूनला होणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघातील १२ स्थानिक स्वराज्य संस्थामधील १,०३१ मतदार मतदान करणार आहेत. डावखरे हे जुनेजाणते व अनुभवी नेते असून त्यांचा जनसंपर्क पक्षातीत असल्याने शिवसेनेला त्यांच्या विरोधात ‘कोटीबाज’ उमेदवार द्यावा लागेल. काही इच्छुकांमध्ये खोक्यांची अहमहमिका लागल्याचे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम व्यावसायिक असलेल्या ठाण्यातील एका नेत्याने उमेदवारी मिळाल्यास विजयाकरिता २० खोक्यांची सर्वोच्च बोली लावल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी डावलण्यात आलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने आपण मतदारांना १५ कोटींचा मस्का लावून सहज विजयी होऊ शकतो, असे सांगितल्याचे समजते.
हे कमी म्हणून की काय महापौर निवडणूक, विधान परिषद, लोकसभा निवडणुकीचा दांडगा अनुभव असलेल्या दुसऱ्या एका धनाढ्य उमेदवाराने आपल्याला घोडेबाजाराचा अनंत अनुभव असल्याने आपणच विजयी होऊ, असे सांगत नाम ललाटी ओढला आहे. कल्याणमधील शिवसेनेच्या लक्षवेधी विजयानंतर श्रेष्ठींच्या मनात ठसलेल्या एका नेत्याने आपल्याकडील ऐश्वर्याचा निवडणुकीत गोपाळकाला करण्याची तयारी दाखवली आहे तर विविध महोत्सवाच्या माध्यमातून अंबर भरारी घेणाऱ्या इच्छुकाने आपली आर्थिक परिस्थिती कशी काँक्रीटसारखी मजबूत आहे हे नेतृत्वाला पटवून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
निवडणुकीतील रंगत वाढल्यामुळे अपक्ष आणि छोटे पक्ष यांचे महत्व वाढले आहे. त्यातील जे पक्ष विचारसरणीनुसार आजपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते, त्या पक्षांना आपल्याकडे वळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढा तर लागलीच पाठिंबा देतो, अशी आॅफर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांच्यापुढे ठेवली होती. मात्र आपण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जन्माला आलो असून आता या वयात पक्षांतर करून आपले नेते शरद पवार यांना क्लेष देणार नाही, असे डावखरे यांनी ठाकरे यांना सांगितल्याचे समजते.

अशी आहे मतदारसंख्या
विधान परिषदेच्या निवडणुकीत पालघर जिल्हा परिषदेचे ५७ सदस्य तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, भिवंडी, वसई-विरार या सात महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर, जव्हार, पालघर, डहाणू या पाच नगरपालिकांतील नगरसेवक मिळून १,०३१ मतदार मतदान करणार आहेत.

Web Title: High my dig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.