ठाण्यात १,८५,६२९ लाभार्थ्यांचे उच्चांकी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:52+5:302021-04-09T04:41:52+5:30
ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरू असलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेंतर्गत गुरुवारअखेर १ लाख ८५ हजार ...
ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरू असलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेंतर्गत गुरुवारअखेर १ लाख ८५ हजार ६२९ लाभार्थ्यांचे ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार केलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्याटप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनातर्फे सुरू आहे.
या मोहिमेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.
मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. तर सध्या ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ठाण्यात एक लाख ८५ हजार ६२९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ६३,०१७ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी, ६० वर्षांवरील ८५ हजार ८१८ नागरिकांना, तसेच ४५ ते ६० वयोगटांतील ३६ हजार ७९४ नागरिकांना लस देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेची आरोग्य केंद्रे व अँटिजेन चाचणी केंद्रे येथे असलेले लसीकरण निःशुल्क आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये असलेल्या लसीकरणासाठी २५० रुपये आकारण्यात येतात. तरी सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.