ठाणे शहर परिसरात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:54 AM2021-02-20T05:54:12+5:302021-02-20T05:54:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जागतिक महामारीच्या चक्रव्यूहातून काहीअंशी बाहेर पडत असतानाच, ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या काहीअंशी वाढताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जागतिक महामारीच्या चक्रव्यूहातून काहीअंशी बाहेर पडत असतानाच, ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या काहीअंशी वाढताना दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या दोन लाख ५९ हजार १२५ पर्यंत पोहोचली आहे, तर मृतांची संख्या सहा हजार २१९ झाली आहे. या मृतांमध्ये सर्वाधिक मृत्यू ठाणे शहर परिसरात एक हजार ३७७ झाल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यांमध्ये वर्षभरात २ लाख ५८ हजार ३२५ रुग्णांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत दोन लाख ४९ हजार २६८ जणांची कोरोनाच्या चक्रव्यूहातून मुक्तता झाली आहे, तर उर्वरित ६ हजार २१९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ६१ हजार ५४४ आढळले आहेत. मात्र, या शहरात ठाणे महापालिकेपेक्षा कमी म्हणजे एक हजार १८३ जाणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे शहर परिसरात आतापर्यंत ६० हजार ६०१ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ५८ हजार २८३ बरे झाले आहेत, तर एक हजार ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------