महापालिकेचा गेल्या २१ वर्षातील जुलै अखेरीस १०० कोटींच्या कर वसुलीचा उच्चांक
By धीरज परब | Published: August 1, 2023 08:03 PM2023-08-01T20:03:58+5:302023-08-01T20:04:09+5:30
मीरा भाईंदर महापालिका स्थापन झाल्या पासूनचा गेल्या २१ वर्षाच्या कालावधीत जुलै अखेरीस १०० कोटींचा कर वसुलीचा आकडा ओलांडण्याचा उच्चांक यंदा महापालिकेने गाठला आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका स्थापन झाल्या पासूनचा गेल्या २१ वर्षाच्या कालावधीत जुलै अखेरीस १०० कोटींचा कर वसुलीचा आकडा ओलांडण्याचा उच्चांक यंदा महापालिकेने गाठला आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी पाठपुरावा तसेच जून व जुलै महिन्यात कर सवलत उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या वर्षी ३१ जुलै पर्यंत महापालिकेने ७५ कोटींची कर वसुली केली होती. यंदा मात्र १०२ कोटी १६ लाख इतकी मालमत्ता कर वसुली या कालावधीत झाली आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी महापालिका कार्यालयात जाणे व रांगा लावणे ह्या कटकटीतून सुटका करण्यासाठी ऑनलाईन कर भरणा सुरु करण्यात आला.
आयुक्त दिलीप ढोले यांनी कर भरण्यासाठी नागरिकांना अद्यावत पालिका संकेतस्थळ व माय एमबीएमसी मोबाईल ॲप चा वापर करण्याचे आवाहन केले होते. ऑनलाईन कर भरल्यास जून महिन्यात ५ टक्के तर जुलै महिन्यात ३ टक्के सवलत आयुक्तांनी जाहीर केली होती.
यंदा अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, सिस्टम मॅनेजर राज घरत, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे सह सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांना मालमत्ता कर वसुली वेगाने करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते.
एकूण १ लाख ८९ हजार १२३ मालमत्ता धारकांनी कर भरला आहे. ७६, ३५१ नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरत ४० कोटी ४३ लाख ५ हजार रुपये जमा केले आहेत. तर १ लाख १२ हजार ७७२ नागरिकांनी रोख रक्कम, चेक व डिमांड ड्राफ्टद्वारे एकूण ६१ कोटी ७३ लाख इतका मालमत्ता कर भरला आहे. जून महिन्यात ५ टक्के सवलत योजनेचा १ लाख ३७ हजार ७२२ नागरिकांनी तर जुलै महिन्यात ३ टक्के सवलत योजनेचा ५१ हजार ८६४ नागरिकांनी लाभ घेतला आहे.
यंदा ३१ जुलै पर्यंत प्रथमच विक्रमी मालमत्ता कर वसुली झाल्याचे सांगत आयुक्त दिलीप ढोले यांनी करदात्या नागरिकां सह महापालिकेच्या अधिकारी - कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. तर ज्या मालमत्ता धारकांनी कर भरला नाही त्यांना एप्रिल, मे, जून व जुलै चे प्रती महिना २ टक्के व्याज लागणार आहे.