ठाण्यात हिंदायान सायकल मोहिम १७ फेब्रुवारीला होणार
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 5, 2023 04:30 PM2023-12-05T16:30:43+5:302023-12-05T16:32:39+5:30
या मोहिमांची माहिती देण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : सायकल मोहिमांना जनसामान्यांमध्ये पोहोचवण्यासाठी हिंदायान फाऊंडेशनतर्फे देशभरात विविध ठिकाणी १० फेब्रुवारी ते ०३ मार्च या काळात वेगवेगळ्या सायकल मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी ठाणे ते मुंबई अशी सायकल मोहिम १७ फेब्रुवारी रोजी होणार असून त्याच दिवशी ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पाच किमी अंतराची सायकल मोहिमही आयोजित करण्यात येणार आहे.
या मोहिमांची माहिती देण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे आणि हिंदायान फाऊंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके उपस्थित होते. या मोहिमांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत रोडे यांनी याप्रसंगी दिली. एक भारत, श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत केंदीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे हिंदायान सायकल मोहिमांचा पुरस्कार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी झालेल्या मोहिमेत भारतीय लष्कर आणि नौदल यांच्या संघांनीही सहभाग घेतला होता. यंदा ही सायकल मोहिम दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून जाणार आहे. नवी दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगर, अहमदाबाद, ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरातून ही मोहिम मार्गक्रमण करणार आहे, अशी माहिती हिंदायान फाऊंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके यांनी दिली.
सर्व व्यावसायिक सायकलस्वारांना विविध सायकल मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दिल्ली ते आग्रा – यमुना एक्सप्रेसवे वरून (२२० किमी), मुंबई – पुणे जुना हायवे आणि १०० किमींच्या प्रत्येकी तीन शर्यतींत व्यावसायिक सायकलस्वार सहभागी होऊ शकतील. तसेच, इतरांना ठाणे ते मुंबई- वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गे, मुंबई ते वाशी, लोणावळा ते पुणे आणि अहमदाबाद ते गांधीनगर या सायकल मोहिमा आहेत. त्याचप्रमाणे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने सुचवल्याप्रमाणे शाळांतील मुलांसाठीही सायकल मोहिमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यास ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे, १७ फेब्रुवारी रोजी ठाणे महापालिका शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच किमी अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे, असे चापके यांनी सांगितले.