आक्रमण न करता हिंदू संस्कृती जगभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:26 AM2018-06-01T00:26:03+5:302018-06-01T00:26:03+5:30
हिंदू संस्कृती ही केवळ पुरातन नसून सनातन आहे.
डोंबिवली : हिंदू संस्कृती ही केवळ पुरातन नसून सनातन आहे. जगातल्या अन्य सर्व प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या तरी, ८०० वर्षे मुघल व १५० वर्षे ब्रिटिश अशा विदेशी आक्र मकांचे आघात सोसून टिकलेली ही एकमेव संस्कृती आहे. आपल्या राजांनी हिंदुस्थानच्या बाहेर कुठल्याही देशावर आक्र मण न करतादेखील ती जगभर पसरली आहे. आपण तिचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आयोगाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
पै फ्रेण्ड्स लायब्ररीच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुण्यातील नावीन्य प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘वाटा आपल्या संस्कृती’च्या या ४३ व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच भांडारी यांच्या हस्ते झाले.
शेवडे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही मागासलेली होती आणि आपापसातील कलहांनी पोखरली होती, हा संस्कार आपल्यावर परकीयांनी केला. आपल्याला न्यूनगंड देऊन गुलामीत ठेवण्याचा हेतू त्यामागे होता. तसे असते तर मुघलांच्या आधीच्या काळात आपल्याकडे शिल्प, वास्तू, धातू, आयुर्वेद, योग, कृषी, वस्त्रनिर्मिती, संगीत, नृत्य, साहित्य, अध्यात्म आदी अनेक शास्त्रे इतकी प्रगत अवस्थेला कशी पोहोचली असती? याचाच अर्थ, लहानलहान गणराज्ये असली, तरी या सर्व विकासाला पोषक असे स्थैर्य त्यावेळी आपल्याकडे निश्चित होते. अशा संपन्न संस्कृतीत आणि देशात जन्माला आल्याचा आपल्याला अभिमान वाटावा, असे शिक्षण शालेय वयातच दिले जायला हवे.
हे पुस्तक म्हणजे ती उणीव दूर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. यानिमित्ताने पै वाचनालयाची पुस्तके जगभर उपलब्ध करून देण्याचा संकल्प पुंडलिक पै यांनी व्यक्त केला. वैदेही वैद्य यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले.