ठाण्यात साजरा झाला हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 30, 2023 02:49 PM2023-08-30T14:49:55+5:302023-08-30T14:50:16+5:30
हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना बांधली राखी
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जातीय सलोखा जपणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आज ठाण्यात पार पडला यावेळी हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला. या सोहळ्यात पोलीस बांधव देखील सहभागी झाले होते.
शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रघुवंशी सभागृहात जातीय सलोख्या अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले. हा मानवजातीचा, एका माणसाने दुसऱ्या माणसाला मदत करण्याचा सोहळा आहे. जसे भावाने बहिणीचे रक्षण करणे अपेक्षित असते तसे बहिणीने भावाचे रक्षण करावे, त्याच्या चुका दाखवावा असा सल्ला सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिला.
परिमंडळ १चे उपायुक्त गणेश गावडे म्हणाले की, सख्ख्या बहिणीकडून राखी बांधण्याचा योग आज आला नसला तरी येथे जमलेल्या भगिनींकडून राखी बांधून घेण्याचा आनंद घेता आला. या सोहळ्याला पोलीस बांधव हे भावाच्या रूपात उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ऋता आव्हाड, नानजी ठक्कर, ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख, केदार दिघे, काँग्रेसचे सचिन शिंदे, गोपाळ लांडगे, आयोजक सचिन चव्हाण व इतर उपस्थित होते.