हिंदुह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीच्या निमित्ताने डोंबिवलीत सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:52 AM2018-01-23T11:52:27+5:302018-01-23T12:34:53+5:30
डोंबिवली: हिंदुह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीच्या निमित्ताने डोंबिवली शिवसेना शहर शाखेने ‘सायकल रॅली’चे आयोजन केले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोरून मोठ्या जल्लोषात निघाली. त्यासाठी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पर्यावरण प्रेमी होते म्हणून त्यांची आठवण आणि समाजात जनजागृती करण्यासाठी ह्या रॅली चे आयोजन केल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली.
सायकल चालवा प्रदुषण रोखा, सायकल चालवा इंधन वाचवा, सायकल चालवा आरोग्य राखा असा संदेश देत शहरातील २०० सायकलपटूंनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रदुषण मुक्तीचा नारा दिला. त्या उपक्रमाला शहरातील सामाजिक संस्थांसह कल्याण सायकल क्लब व परिसरातील सायकलपटू दखिल सहभागी झाले होते. डोंबिवली सायकल क्लबच्या सदस्यांना त्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. डोंबिवली सायकल क्षेत्रात एक प्रेरणादायी व्हावी यासाठी एक नवा पायंडा घालावा असे आवाहन मोरे यांनी यावेळी केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सायकलपटूंना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले. त्यावेळी रॅलीचे आयोजक तात्या माने, प्रा. निषाद पवार, ललित शाईवाले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
असा होता सायकल रॅली चा मार्ग : शिवसेना मध्यवर्ती शाखा - महापालिका कार्यालय - सर्वेश सभागृह - ब्राह्मण सभागृह- फडके रोड- गणपतीमंदिर चौक - नेहरू मैदान - आंध्र बॅक - पेंडसे नगर - मंजुनाथ शाळा चौक - पाथर्ली शंकर मंदिर - गोग्रास वाडी - आईस फॅक्टरी -मानपाडा रोड - चार रस्ता - डोंबिवली पश्चिम दिनदयाळ चौकात रॅलीची समाप्ती झाली.