धर्मनिरपेक्षता टिकवण्याची जबाबदारी आता हिंदूंची- संजय मंगला गोपाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:04 AM2020-02-04T01:04:59+5:302020-02-04T01:05:35+5:30
‘टॉक शो’मध्ये मांडले मत
ठाणे : देश स्वतंत्र झाला, त्यावेळी फाळणीला आणि धर्माधिष्ठित पाकिस्तानात जाण्यास नकार देऊन भारतीय मुसलमानांनी धर्मनिरपेक्षता सिद्ध केली. सद्य:स्थितीत नागरिकता दुरु स्ती कायदा आणि त्यानंतर अपेक्षित जनसंख्या आणि नागरिक नोंदणीतून या देशाला धर्माधिष्ठित राष्ट्र बनू न देणे, ही हिंदू नागरिकांची जबाबदारी आहे, अशा शब्दांत संजय मंगला गोपाळ यांनी मत मांडले.
महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त संविधान, नागरिकता आणि युवकांचे हक्क या विषयावर समता विचार प्रसारक संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित टॉक शोच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. यावेळी कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर म्हणाले की, विविध धर्म, जाती, संस्कृती, वैविध्यातून देश घडला आहे. संविधानाने सर्वांना एका सूत्रात बांधले आहे. संविधानाने जसे धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे, तसेच विवेकवादी बनण्याची दिशाही अधोरेखित केली आहे.
संविधान, नागरिकता आदी मुद्यांवर संवाद प्रक्रिया सुरू ठेवू या. प्रत्येकाला स्वत:चे मत असायला हवे, त्याबरोबरच दुसऱ्यांचे मत ऐकण्याचे सामर्थ्यही असायला पाहिजे. आपले मत दुरु स्त करण्याची तयारीदेखील असली पाहिजे. लेखक आणि संविधान अभ्यासक सुरेश सावंत म्हणाले, संविधान हा एक संकल्प आहे. एका लांब प्रक्रि येतून संविधानाची निर्मिती झाली आहे. लोकांनी निवडून दिलेल्या ३९९ संविधान सभेतील प्रतिनिधींनी प्रदीर्घ चर्चा आणि वाद यातून संविधान निर्माण केले आहे. नागरिकता कायद्यातील दुरु स्ती हे तत्त्व म्हणून संविधानाच्या भूमिकेविरोधी आहे.
‘ओपिनियन फोरम बनवा’
विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर पालकांशी संवाद साधला पाहिजे. युवकांच्या जडणघडणीसाठी ‘एक ओपिनियन फोरम’ बनवावा, असा सल्ला लघुपटकार डॉ. संतोष पाठारे यांनी यावेळी दिला.