हिंदूंनी वाचवली मशीद
By admin | Published: April 20, 2017 03:51 AM2017-04-20T03:51:59+5:302017-04-20T03:51:59+5:30
कल्याण-भिवंडी मार्गालगत असलेल्या कोन गावातील एका मशीदीवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे पथक मंगळवारी पोहचले तेव्हा या कारवाईस हिंदू
कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गालगत असलेल्या कोन गावातील एका मशीदीवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे पथक मंगळवारी पोहचले तेव्हा या कारवाईस हिंदू बांधवांनी विरोध केला. मशीदीवर कारवाई केल्यास ‘आम्ही मंदीर तोडू आणि ते एमएमआरडीएने तोडल्याचे सांगू,’ असा पावित्रा हिंदू ग्रामस्थांनी घेतल्याने एमएमआरडीएला कारवाई न करताच हात हालवत माघारी फिरावे लागले.
त्यानंतर मुस्लिमांनी मशीद तोडण्यास विरोध करणाऱ्या हिंदूंचा जाहीर सत्कार केला व आभार मानले. हिंदू मुस्लिम भाईचारा ग्रामीण भागात कसा घट्ट आहे, त्याचे उदाहरण पाहावयास मिळाले. कोन गावातील खाडी किनारी तडीपार भागात तकवा नावाची मशीद आहे. ही मशीद २००३ मध्ये बांधण्यात आली.
भिवंडी महापालिका व महापालिका नजीकची भिवंडी तालुक्यातील अनेक गावे ही एमएमआरडीए नियोजन प्राधिकरणाच्या अंतर्गत येतात. ही मशीद पाडण्यासाठी एमएमआरडीएने ७ एप्रिल रोजी नोटीस दिली होती. मशीद पाडण्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी मंगळवारी पथकासह कोन गावात पोहचले. ५०० पोलीस, दोन जेसीबी आणि एक पोकलेन असा फौजफाट घेऊन पथक मशीदीपाशी पोहचले. त्यावेळी गावातील हिंदू बांधवांनी कारवाईस मज्जाव केला. पथकाने मशीदवर हातोडा चालविल्यास आम्ही स्वत: गावातील मंदिर पाडू आणि हे मंदिर एमएमआरडीएने पाडल्याचे सांगू असा दम भरला. हिंदूंचा हा पावित्रा पाहून पथकाला चांगलाच घाम फुटला. त्यामुळे ते पथक माघारी परतले.
कल्याणमधील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शरफूद्दीन कर्ते, नगरसेवक काशीब तानकी, मशीदचे प्रमुख रईस खान मोकाशी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी फरदीन करेल यांनी कोन गावच्या सरपंच डॉ. रुपाली अमोल, उपसरपंच महेंद्र नाईक, विनोद म्हात्रे, डॉ. अमोल कराळे यांच्यासह अन्य हिंदू बांधवांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार केला. यावेळी मुस्लिम बांधव हिंदूंनी घेतलेल्या पुढाकाराने भारावले होते. (प्रतिनिधी)