हिरालाल जाधवांच्या अडचणीत वाढ
By admin | Published: December 31, 2016 03:50 AM2016-12-31T03:50:06+5:302016-12-31T03:50:06+5:30
ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधिक्षक हिरालाल जाधव यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या कारागृहातील
ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधिक्षक हिरालाल जाधव यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या कारागृहातील त्या महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर ठाणेनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्तस्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जाधव यांच्या विरोधात विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणि अॅट्रॉसिटी असे एकाच पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आधीच्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समिती नेमली आहे.
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जाधव यांनी स्वत: तसेच विविध हस्तंकामार्फत विविध प्रकारे त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सुरू केले आहेत. याबाबत आपण वेळोवेळी पोलीस, न्यायालय आणि कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे म्हटले आहे. तसेच याचदरम्यान, जाधव हे विविध उच्चपदस्थ सरकारी कार्यालयामध्ये अर्ज करुन माझ्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कारागृह विभागाचे महासंचालक यांना दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याविरुद्ध कार्यवाही होवू नये म्हणून अप्रत्यक्षरित्या कारागृह महासंचालक मदत करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मी अनुसुचित जातीची असूनही कट रचून त्यामध्ये मिश्रा यास सामील करुन खोटी कागदपत्रे तयार करून काही वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध करुन बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
गुन्हा दाखल झाल्याबाबत दुजोरा देऊन अद्यापही कोणालाही अटक केलेली नाही. तसेच याप्रकरणी पोलीस सहाय्यक आयुक्त स्तरावर चौकशी सुरू आहे.
- एम.व्ही.धर्माधिकारी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
ठाणेनगर पोलीस स्टेशन
मी स्वत: मागासवर्गीय आहे, त्यामुळे माझ्याविरोधात अॅस्टॉसिटीन्वये कसा काय गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच अमित मिश्रा याच्याशी माझा काहीही संबंध नाही. - हिरालाल जाधव,
निलंबित अधिक्षक