त्यांचे जीवापाड प्रयत्न अखेर अपयशीच ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:31 AM2021-04-29T04:31:51+5:302021-04-29T04:31:51+5:30
ठाणे : मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. रुग्णांना वाचविण्यासाठी स्थानिक नागरिकांसह ठाणे ...
ठाणे : मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. रुग्णांना वाचविण्यासाठी स्थानिक नागरिकांसह ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शर्तीचे प्रयत्न केले. आगीतून २० रुग्णांना सुखरूप बाहेर काढले. परंतु त्यातील चार रुग्णांचा इतर रुग्णालयात हलविताना मृत्यू झाला. दगावलेले चार रुग्ण हे आयसीयूमध्ये होते, आगीच्या धुरामुळे त्यांचा श्वास कोंडला होता, त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येईपर्यंत त्यांनी जीव गमावला.
मुंब्य्रातील प्राईम केअर या खासगी रुग्णालयाला पहाटे ३.४० वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुंब्रा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या. त्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या इतर गाड्या आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जवळजवळ ४० जणांची टीम घटनास्थळी दाखल होती. तसेच स्थानिक नागरिक या बचावकार्यात एकजुटीने काम करीत होते. कोणी ॲम्ब्युलेन्ससाठी धावत होता, तर कोणी मदत मिळावी म्हणून फोन लावत होता. त्यातूनही आपल्या जीवाची बाजी लावून या सर्वांनी रुग्णालयातील २० रुग्णांना सुखरूप बाहेर काढले. तसेच आजूबाजूला जे रुग्णालय असेल त्या रुग्णालयात त्यांना हलविले. मात्र त्यातील चार रुग्णांचा जीव वाचविण्यात या सर्वच यंत्रणांना अपयश आले. त्यामुळे आम्ही शर्तीचे प्रयत्न केले. मात्र त्या चार जीवांना वाचवू शकलो असतो तर त्याचा जास्त आनंद आम्हाला झाला असता, असे हे सर्व जण सांगत होते. परंतु जे आयसीयूमध्ये दाखल होते, त्यातील चार रुग्ण यात दगावले आहेत. धुरामुळे या रुग्णांना आधीच श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयापर्यंत त्यांना नेताना आणखी त्रास झाला आणि त्यांचे प्राण गेले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
............
वाचली