‘त्याचा’ विजयाचा षटकार ठरला अखेरचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 08:52 AM2022-06-21T08:52:40+5:302022-06-21T08:54:43+5:30
Bhiwandi News: दोन चेंडूंत चार धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या संजय गोविंद ठाकरे या क्रिकेटपटूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच या क्रिकेटपटूवर काळाने झडप घातली.
भिवंडी : दोन चेंडूंत चार धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या संजय गोविंद ठाकरे या क्रिकेटपटूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच या क्रिकेटपटूवर काळाने झडप घातली.
तालुक्यातील अंबाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गोविंद ठाकरे हे उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. रविवारी ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी ‘४५ प्लस क्रिकेट स्पर्धेचे’ तालुक्यातील घोटगाव येथे आयोजन केले होते. ठाकरे हे ‘गुड मॉर्निंग’ संघातर्फे खेळण्यासाठी गेले होते. गुड मॉर्निंग संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकातील दोन चेंडूंवर चार धावांची गरज होती. खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या ठाकरे यांनी उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विजयाचा आनंद साजरा करीत घरी निघालेल्या ठाकरे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तत्काळ अंबाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.