ऐतिहासिक माहुली किल्ला दुर्लक्षित; सोयीसुविधांची वानवा, पर्यटकांची होतेय गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 01:03 AM2020-12-01T01:03:07+5:302020-12-01T01:03:56+5:30

डागडुजीची गरज, सह्याद्री पर्वताच्या रांगांपैकी हा एक डोंगर अतिउंच सुळक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गसमृद्धी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माहुली गड अंगाला शहारे आणणाऱ्या स्थितीत इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करीत आहे.

Historic Mahuli fort overlooked; Lack of facilities, inconvenience to tourists | ऐतिहासिक माहुली किल्ला दुर्लक्षित; सोयीसुविधांची वानवा, पर्यटकांची होतेय गैरसोय

ऐतिहासिक माहुली किल्ला दुर्लक्षित; सोयीसुविधांची वानवा, पर्यटकांची होतेय गैरसोय

googlenewsNext

सुरेश लोखंडे

ठाणे : बालशिवबांवर गर्भसंस्कार करणारा, तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंचीवरील म्हणजे समुद्रसपाटीपासून २,८१५ फुटांवर असलेला शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला विविध स्वरूपांच्या डागडुजीसह सोयीसुविधांपासून अद्यापही वंचितच आहे. राज्यभरातील गिरिप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करणाऱ्यांना या गडावर विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सह्याद्री पर्वताच्या रांगांपैकी हा एक डोंगर अतिउंच सुळक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गसमृद्धी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माहुली गड अंगाला शहारे आणणाऱ्या स्थितीत इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करीत आहे. शहापूर शहराच्या वायव्य दिशेला अवघ्या आठ किमी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या दरीमधील उंच शिखरावर त्याचा सुळका आजच्या पिढीला विचार करण्यास भाग पाडत आहे. जवळ असलेली कल्याण व सोपारा (जि. पालघर) ही मालवाहतुकीची बंदरे, माहुलीवरून जव्हारमार्गे सुरत तसेच मुरबाड नाणेघाटमार्गे नगर, नाशिक अशा भौगोलिक रचनेमुळे इतिहासात या किल्ल्याला विशेष महत्त्व होते.

ऐतिहासिक महत्त्व

  • शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी जिजामाता भोसले यांचे या माहुली किल्ल्यावर काही काळ वास्तव्य होते. त्यामुळे शिवबांची गर्भसंस्कारभूमी म्हणूनही हा किल्ला शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे. 
  • निजामशाहीचे संचालक म्हणून १६३५-३६ मध्ये शहाजीराजे बाळ शिवाजी व जिजाबाईंसह निजामाच्या शेवटच्या वारसाला घेऊन या गडावर वास्तव्याला होते. या दरम्यान १६३६ मध्ये मोगल सेनापती खानजमान याने या गडास वेढा दिला होता.

 

किल्ल्याच्या महादरवाजाची पूर्णपणे पडझड झाली असून खोदलेल्या पायऱ्यांवर ढासळलेल्या बुरुजांची दगडमाती पडलेले आहे. रस्त्यावर केवड्याची वने वाढल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. कल्याण दरवाजा, घाण दरवाजा हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. ३० फूट लांब व रुंद राजसदरेचे फक्त कातळ दगडाचे जोते शिल्लक आहे. 

आम्ही गडावर स्वच्छता मोहीम, गड परिक्रमा, माहुली जागर यासारखे कार्यक्रम राबवितो. परंतु, किल्ल्याची डागडुजी न केल्यास गडावरील ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची भीती आहे. - राजेश मोगरे, माहुली सेवा निसर्ग न्यास, शहापूर

गडाच्या पायथ्याशी भक्त निवारा केंद्र उभारले आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’, ‘स्वदेशदर्शन’ यासारख्या योजनेत या किल्ल्याचा समावेश झाल्यास या परिसराचा पर्यटन केंद्र म्हणून विकास होऊ शकतो. - विनोद लुटे, गडप्रेमी 


 

Web Title: Historic Mahuli fort overlooked; Lack of facilities, inconvenience to tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.