धक्कादायक! ऐतिहासिक 'वसई किल्ला' बनला मद्यपींचा अड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:49 PM2024-09-06T13:49:03+5:302024-09-06T13:52:31+5:30
पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक मद्यपींचा राबता वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : वसईच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरलेला, चारशे वर्षांचा साक्षीदार म्हणून जगविख्यात असलेला प्राचीन 'वसई किल्ला' सध्या मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. यावर पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक मद्यपींचा राबता वाढला आहे. विशेष म्हणजे या भागात गैर कृत्य होऊ नये म्हणून पुरातत्व विभागामार्फत १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. तरीही राजरोसपणे अनेक गैरप्रकार घडत असतात. नव्याने घडलेल्या घटनेत अशीच मद्य मैफील शिवसैनिकांनी उधळून लावलेली आहे.
अधिक माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिर नजीक बालेकिल्ला येथे काही मद्यपी मद्यपान करीत असल्याची माहिती वसईतील (उबाठा गट) शिवसैनिकांना प्राप्त झाली. त्याची खातरजमा करण्यासाठी कोर्ट नाका विभाग प्रमुख दत्ता जाधव, उमेळा विभाग प्रमुख राकेश कदम यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता, पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर ऐतिहासिक बालेकिल्ल्याच्या वरच्या बाजूस मद्यपींची मैफिल रंगलेली दिसली.
यावर आक्षेप घेत सदर मद्यपींना वसई पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. आरोपी पैकी विक्रम दुबे (२७) व अन्य तीन यांना अटक करून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली. अधिक तपास पोलीस हवालदार कोकरे करीत आहेत.