ऐतिहासिक म्हसा यात्रेच्या डॉक्युमेंटेशनला सुरुवात

By Admin | Published: January 11, 2017 07:00 AM2017-01-11T07:00:36+5:302017-01-11T07:00:36+5:30

पौष पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेची परंपरा, संस्कृती, त्यात काळानुरूप झालेला बदल यात्रेचे वैशिष्ट्य असलेला

The history of the historic Mhasa Yatra begins | ऐतिहासिक म्हसा यात्रेच्या डॉक्युमेंटेशनला सुरुवात

ऐतिहासिक म्हसा यात्रेच्या डॉक्युमेंटेशनला सुरुवात

googlenewsNext

आमोद काटदरे / ठाणे
पौष पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेची परंपरा, संस्कृती, त्यात काळानुरूप झालेला बदल यात्रेचे वैशिष्ट्य असलेला बैलबाजार, घोंगडीबाजार, शेती अवजारांचा बाजार, करमणूक आदींचे डॉक्युमेंटेशन करण्याचे काम रायता येथील ‘अश्वमेघ प्रतिष्ठान’ आणि ‘उल्हास रिसर्च सेंटर’ने हाती घेतले आहे. विविध पातळीवर, विविध ठिकाणी त्याचे चित्रीकरण सुरू आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास या संस्थांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्यातील या यात्रेला विशेष महत्त्व आहे. सरकारने १८८२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या गॅझेटमध्येही त्याची नोंद आहे. काळानुरूप या यात्रेच्या स्वरूपात काही बदल झाले आहेत. त्यामुळे पुढील पिढीला या यात्रेची पारंपरिकता समजावी, यासाठी हे डॉक्युमेंटेशनचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
पूर्वी पौष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हसा येथील खांबलिंगेश्वर मंदिरात १२ निशाण येत असत. निशाण म्हणजे २० ते २५ फूट उंच बांबू असत. त्यावर मोरपिसे आणि अन्य सजावट असे. हुतात्म्यांच्या बलिदानासाठी प्रसिद्ध असलेल्या सिद्घगडच्या किल्लेदारांना निशाणाचा पहिला मान होता. या किल्ल्यावरील नारमाता देवीच्या देवळातून हे निशाण चालत, नाचवत किल्ल्यापासून म्हसापर्यंत आणले जाई. परंतु, आता किल्ले परिसरातील कमी झालेली वस्ती, नोकरदार वर्गाला न मिळणारी सुट्टी तसेच काळानुरूप झालेल्या बदलांमुळे तेथून येणारे निशाण आता जवळपास थांबले आहे. त्याऐवजी नारमाता देवीचे दर्शन घेऊन देवळालाच निशाणाची प्रदक्षिणा केली जाते. मोजकीच निशाणे ठिकठिकाणांहून म्हसापर्यंत आणली जातात. त्यात आगरी समाजातील निशाण आजही येते. निशाण आल्यानंतर म्हसा यात्रेतील बैलबाजाराला सुरुवात होते. म्हसा येथील खांबलिंगेश्वर हे शंकराचेच एक स्वरूप आहे. तो या परिसराचा क्षेत्रपाल अथवा अधिपती आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिराशेजारी असलेल्या खांबापाशी गळ लावून तो पूर्ण केला जातो. ही गळ लावण्याची प्रथा दक्षिण भारतांप्रमाणे असल्याचे सांगितले जाते. खांबलिंगेश्वरच्या मंदिराशेजारी पूर्वी गुठी होती. गुठी म्हणजे मोठा गोल दगड. पूर्वी यात्रेला येणारे पहेलवान हा दगड उचलून खांद्यावरून पाठीमागे टाकत असत. आता ही गुठीही गायब झाली.

या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्यमध्ये घोंगडी बाजार. आजही शेती शिल्लक असल्याने शेतकरी या यात्रेत आवर्जून घोंगड्या खरेदी करतात. सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशातून तेथील हातमाग सोसायट्या विविध प्रकारच्या घोंगड्या, ब्लँकेट घेऊन येतात. शेतीच्या अवजारांचीही खरेदी जनावरांसोबतच होते. त्याचबरोबर आजही या बाजारात भाताच्या बदल्यात सुकी मासळी खरेदी केली जाते.

ग्रामीण पर्यटनाची उत्तम संधी

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने म्हसा यात्रेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या यात्रेत कोट्यवधींची उलाढाल होत असली, तरी
ग्रामीण यात्रेतील पर्यटनाची संधी म्हणून ही यात्रा प्रकाशात आणता येईल.

 परदेशी पर्यटकांना अस्सल यात्रेचे दर्शन घडवता येईल. त्यासाठी चार-सहा महिन्यांपासून नियोजनबद्ध आराखडा तयार करायला हवा.

मुंबईतील पंचतारिकत हॉटेलांमध्ये या यात्रेची किमान माहितीपत्रके ठेवली, तरी येथे देशी-परदेशी पर्यटक आकर्षित होऊ शकतात, असे संस्थांचे म्हणणे आहे.

यात्रेत मिठाई, खेळणी, भांडी, केळी, खाद्यपदार्थांचे स्टॉल लागतात. शहरी भागातील नागरिक कारमधून येतात. तंबू ठोकून मटणावर आडवा हात मारण्याला त्यांची अधिक पसंती असते.

Web Title: The history of the historic Mhasa Yatra begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.