उलगडणार ऐतिहासिक नाण्यांचा इतिहास
By Admin | Published: March 18, 2017 03:45 AM2017-03-18T03:45:12+5:302017-03-18T03:45:12+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक नाण्यांचे ५५ वे प्रदर्शन ठाणेकरांच्या भेटीला येत आहे. यात शिवकालीन व शिवपूर्वकालीन नाणी व मुद्रा
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक नाण्यांचे ५५ वे प्रदर्शन ठाणेकरांच्या भेटीला येत आहे. यात शिवकालीन व शिवपूर्वकालीन नाणी व मुद्रा पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे त्या नाण्यांची राजकीय व ऐतिहासिक माहितीदेखील सादर केली जाणार आहे.
ठाणे पूर्वमधील पारशीवाडीतील ‘शिवदुर्ग ग्रुप’ हा तरु णांचा समूह गेली काही वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊन गडकोटसंवर्धन, किल्ले स्पर्धेत सहभाग, दुर्गभ्रमण अशा उपक्र मांतून तो इतिहास अभ्यासण्याचा, जपण्याचा व इतर तरु णांनाही त्याचे महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तरु णांना इतिहासाजवळ नेऊन त्याच्याबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे, असे आयोजकांनी सांगितले. हे प्रदर्शन शनिवार, १८ मार्च रोजी वसंत पाटील चाळ, पारशीवाडी, कोपरी कॉलनी, कोपरी पोलीस स्टेशनजवळ, ठाणे (पू.) येथे आयोजित केले असून नाणीसंग्राहक प्रशांत ठोसर यांच्या संग्रहातील नाणी यात पाहायला मिळणार आहेत. यात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतरच्या काळातील छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतील चलनात असलेली होण (सुवर्णमुद्रा), शिवराई (ताम्रमुद्रा) अशा प्रकारची दुर्मीळ व आकर्षक नाणी या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. संभाजी महाराजांच्या काळातील दुर्मीळ नाणीसुद्धा प्रदर्शनात पाहायला मिळतील. २००५ साली मुलुंड येथे पहिले ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी आणि इतिहासाशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. (प्रतिनिधी)