ठाण्याचा इतिहास जाणून घेतला पाहिजे : राजवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 02:07 AM2019-08-15T02:07:53+5:302019-08-15T02:08:04+5:30
ठाणे या नावाला एक हजार ४४४ वर्षांचा प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
ठाणे : ठाणे या नावाला एक हजार ४४४ वर्षांचा प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तान्हा, ताना, श्री स्थानक व ठाणे अशा स्थितंतरात शिलाहार, यादव, बिंबराजे, मुस्लिम, पोर्तुगीज, मराठे व इंग्रज असे बहुविध अंमल आले आणि गेले. या साऱ्यांचा ठाणे साक्षीदार आहे. खरोखरच, ठाण्याचा प्रदीर्घ इतिहास प्रेरणादायी आहे. तो आजच्या ठाणेकर तरु णाईने जाणून घेतला पाहिजे, असे ठाण्याचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्तात्रेय राजवाडे यांनी सांगितले.
विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ , ठाणे (पूर्व) यांच्या विद्यमाने मेघदूत गृह संकुल सभागृहात ठाण्याचा इतिहास या विषयावर व्याखान देताना राजवाडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वरील सर्व अमलांत ठाण्याच्या सत्यानाशाला कारणीभूत ठरले ते पोर्तुगीज. जॉर्ज फोर्ट (बोरीबंदर) ते तन्नाई (ठाणे) या ३४ किलोमीटर अंतरावर १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी धावली आणि त्याचक्षणी ठाण्याची भाग्यरेषा विश्वात उजळली. कोळी आणि आगरी हे ठाण्याचे आद्य नागरिक आहेत. सर्वधर्मसमभावांच्या खाणाखुणा ठाण्यात आढळत असल्या तरी मूळ ठाणेकर हा हिंदू धर्माचा अभिमानी होता आणि आहे, असे त्यांनी समारोपात सांगितले. या प्रसंगी ठाणेभूषण ८५ वर्षीय ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांच्या हस्ते व्याखाते राजवाडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. विश्वास जोशी, दीपक घारे, शांताराम ठाकूर, पुरुषोत्तम प्रभू, विकास कणेकर आदी उपस्थित होते.