गणपती कार्यशाळांना फटका; महामारीमुळे आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:06 AM2020-07-24T00:06:31+5:302020-07-24T00:06:47+5:30
अर्ध्यापेक्षा जास्त मूर्तींची नोंदणीच नाही
नागोठणे : दरवर्षी गणेशमूर्तींची जून महिन्यापासून आगाऊ नोंदणी होत असते. मात्र, श्रावण महिना चालू होऊनही दरवर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त मूर्तींची नोंदणीच झाली नसल्याने, कोरोना महामारीचा फटका येथील एका दिव्यांग गणेश कार्यशाळाचालकाला बसला आहे. तयार अर्ध्याअधिक मूर्ती शिल्लक राहिल्या, तर प्रचंड अशा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
येथील खडकआळीत राहणारे प्रवीण राऊत दिव्यांग असून, आपली दिव्यांग पत्नी, तसेच इतर चार-पाच कामगारांसह दरवर्षी गणेशमूर्तींचा व्यवसाय करीत असतात. मे महिन्यात पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवा, दादर आदी गावांतून घडविलेल्या गणेशमूर्ती आणून मूर्तीला सुबक अशी रंगरंगोटी करून त्याची विक्री करीत असतात. दरवर्षी २५० ते ३०० मूर्ती आणल्या जातात, असे प्रवीणचे वडील लक्ष्मण राऊत यांनी सांगितले.
जून महिन्यापर्यंत साधारणत: २५० गणेशमूर्तींची आगाऊ नोंदणी होत असते. गणेशोत्सवाला महिनाही राहिलेला नाही. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे या वर्षी १५० गणेशमूर्तींचेही आगाऊ बुकिंग झालेले नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यामुळे मोठ्या अडचणीत सापडलो असल्याचे ते म्हणाले.
पगार रखडले
चार महिन्यांचे जागेचे भाडे, विद्युत पुरवठा, तसेच गणेशमूर्ती व त्याला लागणारा खर्च हा साधारणत: दोन लाखांपर्यंत जातो आणि रंगकामासाठी पाच कामगार कार्यरत असतात. त्यांचे पगारावर हजारो रुपये खर्ची पडत असतात, परंतु अजून शंभर एक मूर्ती विकल्या गेल्या नाहीत, तर प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची भीती गणेशमूर्तिकारांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.