घोडबंदर खिंडीत गरोदर मादी बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:42 PM2020-11-16T17:42:15+5:302020-11-16T17:42:48+5:30

बिबट्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Hit by speeding car pregnant leopard dies in Mumbai | घोडबंदर खिंडीत गरोदर मादी बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

घोडबंदर खिंडीत गरोदर मादी बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

Next

मीरारोड- पोटात तीन पिल्लं असलेल्या गर्भार बिबट्या मादीचा मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर खिंडीत मृत्यू झाला. एका भरधाव वाहनाने जबर धडक दिल्यानं मादी बिबट्या दगावली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून या भागातील बिबट्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घोडबंदर खिंडीजवळ महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात घडला. एका भरधाव वाहनाने रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या मादी बिबट्यास जबर धडक दिली. त्यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास सदर बिबट्या वाघीण जखमी पडलेली दिसल्याने त्वरित वन विभागास कळवण्यात आले. 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जखमी बिबट्यास बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी नेले असता पहाटे अडीचच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तिचे शवविच्छेदन केले असता तिच्या पोटात तीन पिल्लं आढळून आली. सदर मृत बिबट्या मादी ३ ते ४ वर्षांची असल्याचा अंदाज असून तिच्या गर्भधारणेचा कालावधी अहवाल आल्यानंतर कळू शकेल असे सूत्रांनी सांगितले. 

या अपघात प्रकरणी वनपाल मनोज पाटील म्हणाले की, सदर घटना अतिशय दुःखद व दुर्दैवी असून या मुळे बिबट्या प्रजातीची आणि वन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे . धडक देणाऱ्या वाहन आणि चालकावर वन्यजीव संरक्षण कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. 

राजकारणी आणि प्रशासनाच्या स्वार्थी हलगर्जीपणाचे बळी 
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर खिंडीत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी वन हद्दीतील डोंगर फोडण्यासह मोठी झाडे नष्ट करण्यात आली आहेत. रुंदीकरण व त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकारणी धडपडतात. परंतु वन्य जीवांच्या सुरक्षिततेचे मात्र ह्या राजकारणी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही. 

वास्तविक या ठिकाणा वरून बिबट्या वाघ आणि पिल्लांचा वर्षानु वर्षे राबता असतो . महामार्ग ओलांडून बिबट्या वाघ हे खाली जंगल पत्ता व घोडबंदर गावा सह घोडबंदर किल्ला परिसरात रात्री ते पहाटे दरम्यान ये जा करत असतात . त्यामुळे महामार्गावर वाहनचालकांना वाहने हळू चालवा म्हणून फलक लावण्यासह वाहनांच्या वेगावर नियंत्र रहावे यासाठी गतिरोधक आदी उपाय योजना करण्याची आवश्यकता असताना त्या कडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे . 

आता तर या ठिकाणी रस्ता रुंद केल्याने बिबट्या वाघांना रस्ता ओलांडणे प्राणघातक ठरत आहे . वास्तविक रस्ता रुंदीकरण करताना देखील बिबट्यांच्या येण्या जाण्याचा मार्ग पाहता येथे भुयारी मार्ग वा महामार्गावरून मार्ग तयार करावेत अशी मागणी केली जात होती. परंतु राजकारण्यांसह प्रशासनानेदेखील या गंभीर बाबीकडे कानाडोळा केला. त्यातूनच शनिवारी रात्रीचा दुर्दैवी अपघात घडला आहे. मादा बिबट्यासह तिच्या पोटातील ३ पिल्लांच्या मृत्यूस स्वार्थी संधीसाधू राजकारणी आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा संताप  वनशक्तीचे संचालक दयानंद स्टॅलिन यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Hit by speeding car pregnant leopard dies in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.