राष्ट्रवादीकडून ठाण्यात महागाईविराेधात ‘श्री राम, जय राम’चे होर्डिंग्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:47 AM2022-04-20T11:47:52+5:302022-04-20T11:48:17+5:30
"प्रभू रामाच्या नावाखाली धार्मिक विद्वेष पसरवून जनतेचे महागाईवरील लक्ष विचलित केले जात आहे."
ठाणे : मनसेने ठाण्याच्या विविध भागांत ‘चलो अयोध्या’चे बॅनर लावले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात ‘श्री राम, जय राम, जय जय राम’चे हाेर्डिंग लावून जीवघेण्या महागाईकडे लक्ष वेधले आहे. प्रभू रामाच्या नावाखाली धार्मिक विद्वेष पसरवून जनतेचे महागाईवरील लक्ष विचलित केले जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या सभा घेणाऱ्यांनी आपल्या सभेतून याबाबत जाब विचारण्याचे धैर्य दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीने शहरभर इंधनाचे तुलनात्मक दर दर्शवणारे फलक लावले आहेत. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर ७१ रुपये होता, तर आता ताे १२१ रुपयांच्या घरात आहे. २०१४ मध्ये डिझेल ५६ रुपये होते. आता तो दर १०५ रुपये झाला आहे. २०१४ मध्ये ४१० रुपयांत मिळणारा गॅस सिलिंडर आता ९५० रुपये झाला आहे. या महागाईमुळे आता जनतेला ‘श्री राम, जय राम, जय जय राम’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशा आशयाचे फलक सध्या ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. भाजप कार्यालयाच्या समोरच असा होर्डिंग्ज लावून भाजपच्या येथील नेत्यांनी पंतप्रधान मोदींपर्यंत जनतेचा आक्राेश पोहाेचवावा, असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.
दरम्यान, महागाईने गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्याची फिकीर कोणालाही नाही. इंधन दरवाढीविरोधात आंदोलने करून सत्तेवर आलेल्या भाजपला आपल्या सत्ताकाळात हे वाढलेले दर दिसत नाहीत, यासारखे दुर्दैव कोणते असणार? मोदी या महागाईबाबत कोणतेही भाष्य करीत नाहीत, तर राज्यात मोठ्या सभा घेणारे काही नेते धार्मिक उन्माद माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
‘राज तिलक की करो तयारी, आ रहा है भगवाधारी’, असे म्हणत महागाईवर जनतेचे लक्ष जाऊ नये, यासाठी धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आराेप परांजपे यांनी केला.