हॉकी, फुटबॉलसाठी क्रिकेटला तिलांजली

By admin | Published: January 20, 2016 01:54 AM2016-01-20T01:54:40+5:302016-01-20T01:54:40+5:30

क्रिकेटच्या माध्यमातून इतर खेळांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी लोढा समितीने केलेल्या शिफारशीचा आधार घेत क्रिकेटचा एकमेव आधार असलेले ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम

Hockey, football for football survived | हॉकी, फुटबॉलसाठी क्रिकेटला तिलांजली

हॉकी, फुटबॉलसाठी क्रिकेटला तिलांजली

Next

अजित मांडके,  ठाणे
क्रिकेटच्या माध्यमातून इतर खेळांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी लोढा समितीने केलेल्या शिफारशीचा आधार घेत क्रिकेटचा एकमेव आधार असलेले ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम इतर खेळांसाठी उपलब्ध करून देण्यास क्रिकेटपटूंनी कडाडून विरोध दर्शवला आहे. इतर खेळांसाठी पूरक सोयी उभारण्योेवजी आहे त्याच मैदानात घुसखोरी कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कसाबसा तग धरलेल्या क्रिकेटला यातून नख लागेल, पीचचे नुकसान होईल आणि कोणत्याच खेळाला धड पायाभूत सुविधा मिळणार नाहीत, असे आक्षेप त्यांनी नोंदवले आहेत.
खेळपट्टी खराब होणार नाही. याची काळजी घेत या क्रीडागृहात हॉकी आणि फुटबॉलच्या मॅचही घेता येऊ शकतात, असा प्रस्ताव मांडला गेला आहे. या स्टेडीयमध्ये क्रीडा प्रकारांपेक्षा सांस्कृतिक कार्यक्रमांचीच रेलचेल अधिक असते. पण त्यातूनही खर्चाची तोंडमिळवणी होत नसल्याने पालिकेच्या दरबारी त्याची ओळख पांढरा हत्ती अशी झाली आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यानेच पालिकेने हा घाट घातल्याचे बोलले जाते. सध्या येथे केवळ स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामने होतात. शिवाय अ‍ॅथलेटिक्ससाठी सिंथेटीक ट्रॅकचा प्रस्तावही अंतिम टप्यात आहे. त्यालाही क्रिकेटपटूंचा विरोध आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेने पहिल्या टप्यात हॉकीसाठी हे मैदान खुले करण्याचा घाट घातला आहे. दुसऱ्या टप्यात फुटबॉलसाठीही विचार सुरु केला आहे. यामुळे किक्रेटची खेळपट्टी खराब होणार नसल्याचा दावा पालिका करीत असली तरी क्रिकेट तज्ज्ञांना मात्र खेळपट्टीला धोका पोचेल अशी भीती वाटते. किंबहुना हॉकी आणि फुटबॉल खेळाला सुरवात झाली तर येथील क्रिकेट कायमचे संपुष्टात येईल असाही त्यांचा सूर आहे.
स्पॉट फिक्स्ािंग, सट्टा यांचा तपास करताकरता आधी मुद््गल समितीने आणि नंतर लोढा समितीने केलेल्या शिफारशींमध्ये क्रिकेटच्या पुढाकारातून किंवा मैदांनाचा खर्च जर प्रशासनाला परवडत नसेल तर त्यांनी तेथे हॉकी अथवा फुटबॉलच्या मॅच खेळविण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते करताना क्रिकेटची खेळपट्टी खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी असेही नमूद केले आहे. पण ते व्यवहार्य नसल्याने भारतातील अनेक क्रिकेट संघटनांनी याला विरोध केला आहे. मात्र शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार पालिकेने तत्काळ त्यानुसार प्रस्ताव तयार केल्याने एकंदरच पालिकेला नेमकी कोणती आणि कशी क्रीडासंस्कृती रूजवायची आहे, हा मुद्दा चर्चेत आला आहे.
डीवायला आधार
आयसीएलचा
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडीयमध्ये फुटबॉलचे सामने होतात. पण त्यावेळी खेळपट्टीच्या नुकसानीसह संपूर्ण खर्च आयोजकांकडून वसूल होतो. त्याचा भार स्टेडीयमवर येत नाही. दादोजी क्रीडागृहात जर असा प्रकार झाला, तर खराब होणाऱ्या खेळपट्टीचा खर्च कोण उचलणार हा क्रीडापटूंचा प्रश्न आहे. डी. वाय. पाटील स्टेडीयमवर फुटबॉल सामान्यांच्या वेळी खेळपट्टीवर आच्छादन टाकले जाते. त्याचा खर्च कोट्यवधीच्या घरात आहे. तो खर्च पालिकेला किंवा फुटबॉल-हॉकी खेळवणाऱ्या संघटनेला पेलवणार आहे का? याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे अन्य केळांवर अकारण खेळपट्टी टिकवण्याचा ताण राहील.
अर्ध्या जागेवर हॉकीचे सामने
पालिकेने स्टेडीयमच्या अर्ध्या जागेवर हॉकीचे सामने खेळविण्याची तयारी सुरु केली असली, तरी प्रत्यक्षात मैदान असे अर्धे अर्धे वाटता येत नाही. संपूर्ण ग्राऊंडचाच वापर होईल. तसे प्रत्यक्षात आले तर क्रिकेटच्या सरावासाठी तेथे केवळ एक कोपरा शिल्लक राहणार असल्याने केवळ सराव करा आणि सामने खेळायचे असतील तर दुसरीकडे जा अशी वेळ येईल, अशी भावना क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे.
बाळासाहेबांचे स्वप्नही भंगणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील हे स्टेडीयम असून स्थानिक क्रिकेटपटूंना हक्काचे क्रीडागृह असावे, जेणेकरुन येथून क्रिकेटपटू तयार होऊन ते भारतीय टीमचे प्रतिनिधित्व करु शकतील, असा त्यांचा विश्वास होता. त्यातूनच अविष्कार साळवी, कौस्तुब पवार आदींसह इतर क्रिकेटपटू याच मैदानाने क्रिकेटविश्वाला दिले. परंतु आता बाळासाहेबांच्या नातवाने तेथे हॉकीचे सामने खेळवण्यासाठी प्रशासनाला गळ घातल्याने बाळासाहेबांचे स्वप्न कायम ठेवायचे की नातवाचे प्रत्यक्षात आणायचे अशी कोंडी शिवसनेच्या नेत्यांपुढे आहे.
शिवसेनेच्या काही मोजक्या जाणकार नेत्यांपैकी एक असलेले दिवंगत प्रकाश परांजपे यांच्या कार्यकाळात दादोजी कोंडदेव स्टेडीयमसंदर्भात एक ठराव झाला होता. त्यानुसार फुटबॉल अथवा हॉकीच्या कोणत्याही प्रकारच्या मॅचसाठी हे मैदान देता येणार नसून यामुळे किक्रेटची खेळपट्टी खराब होऊ शकते, असे त्यात नमूद करण्यात आले होते.
त्यामुळे पालिकेने आणि क्रीडा संस्कृतीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या शिवसेनेने या ठरावाला तिलांजली दिली का? याची आठवणही क्रिकेटपटूंनी करून दिली आहे. पाच वर्षापूर्वी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी या स्टेडीयमवर फुटबॉलच्या इंटरस्कुल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तेव्हा याच ठरावाचा आधार घेत पालिकेने या स्पर्धेला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना इतरत्र स्पर्धा घ्याव्या लागल्या होत्या.
रणजीसाठी दोन कोटींच्या ठरावाला तिलांजली
दादोजी कोंडदेव क्रीडागृहात १९९७ च्या सुमारास रणजीचे सामने झाले होते. मुंबई, महाराष्ट्र, सौराष्ट्र अशा सामन्यांची लज्जत क्रीडापटूंनी चाखली होती. त्यानंतर अद्यापही येथे रणजीचा एकही सामना झालेला नाही. गेल्या वर्षी पुन्हा या स्टेडीयममध्ये रणजी सामने खेळविण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या होत्या. पण मुंबईत सध्या त्यासाठी ज्या सोयी उपलब्ध आहेत, त्यासाठी क्रिकेटची खेळपट्टी तयार करणे, लॉन विकसित करणे आदींसह इतर कामे केली जाणार होती. त्यासाठी दोन कोटींचा प्रस्तावही प्रशासनाने तयार केला होता. फुटबॉल, हॉकीचा निर्णय झाला, तर त्या प्रस्तावालाही तिलांजली दिली जाईल.

Web Title: Hockey, football for football survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.