कशेळी टोलनाक्यावर ‘वंचित’चे खड्ड्यांविराेधात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:56+5:302021-09-25T04:43:56+5:30
भिवंडी : भिवंडी शहरासह भिवंडी- ठाणे महामार्ग, भिवंडी-कशेळी- ठाणे व भिवंडी- अंजूरफाटा- खारबाव- कामण या सर्वच बीओटीवरील रस्त्यांवर सध्या ...
भिवंडी : भिवंडी शहरासह भिवंडी- ठाणे महामार्ग, भिवंडी-कशेळी- ठाणे व भिवंडी- अंजूरफाटा- खारबाव- कामण या सर्वच बीओटीवरील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक वाहनचालक सर्वच त्रस्त झाले आहेत. वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कशेळी टोलनाका येथे ठाणे- भिवंडी या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक पूर्णेश्वर टेम्पो मालक-चालक संघटनेनेही या आंदोलनात सहभाग घेत रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात संताप व्यक्त केला.
वंचितने केलेल्या या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडावर हात, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कानावर हात, तर केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे डोळ्यांवर हात, अशा स्वरूपाचे बॅनर झळकावीत शासनकर्त्यांचा निषेध केला आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी व पूर्णेश्वर टेम्पोचालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून कशेळी टोलनाक्यावर नारपोली पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.