आयुक्तांवर कागदपत्रे भिरकावणारा ताब्यात
By Admin | Published: January 10, 2017 06:18 AM2017-01-10T06:18:04+5:302017-01-10T06:18:04+5:30
वारंवार तक्रार करूनही पाणीगळतीचा प्रश्न सुटत नसल्याने आणि लोकशाही दिनातही खेटे घालायला लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त
कल्याण : वारंवार तक्रार करूनही पाणीगळतीचा प्रश्न सुटत नसल्याने आणि लोकशाही दिनातही खेटे घालायला लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या दिशेने कागद भिरकवणाऱ्या नागरिकाला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. हरिश्चंद्र यादव असे त्याचे नाव आहे. तो सूचकनाका येथे राहतो. महापालिकेच्या लोकशाही दिनात सोमवारी ही घटना घडली.
यादवच्या परिसरात पाणी गळतीची समस्या आहे. त्याच्या भावाच्या जागेवर अतिक्रमण करून शाळा बांधली आहे. ते हटविण्यासाठी पालिकेकडे ते गेली सात वर्षे पाठपुरावा करत आहेत. त्याला प्रशासनाकडून दाद दिली जात नाही.
गेल्या चार लोकशाही दिनापासून ते महापालिकेत खेटे घालत आहेत. लोकशाही दिनात सोमवारी त्यांचा नंबर आला. त्यांनी आयुक्त रवींद्रन यांच्या दालनात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या दिशेने कागद भिरकावल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे आयुक्तांनी महापालिकेच्या सुरक्षारक्षकाना बोलावले. रक्षकांनी यादव यांना पकडून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची सुटका झालेली नव्हती.
यासंदर्भात विचारणा केल्यावर यादव म्हणाले, आयुक्तांच्या दिशेने मी माझ्या कामाची फाईल सरकवली. त्यांनी त्याचा गैरअर्थ घेऊन भिरकावल्याचा समज करुन घेतला. मला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी मला बसवून ठेवले आहे. (प्रतिनिधी)