आज सर्वत्र होणार होळीचा जल्लोष
By admin | Published: March 23, 2016 02:02 AM2016-03-23T02:02:59+5:302016-03-23T02:02:59+5:30
पालघर जिल्ह्यातील वसई ते झाई बोर्डी दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावर रहाणाऱ्या मच्छिमारी गावामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो
पालघर : पालघर जिल्ह्यातील वसई ते झाई बोर्डी दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावर रहाणाऱ्या मच्छिमारी गावामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या भागातील भेंडी, सुपारीचे झाड तोडून बँडबाजाच्या गजरात पुरूष मंडळी खांद्यावर घेऊन वाजत गाजत आपापल्या मंडळात आणतात. तर महिलावर्गही होळीमातेची (झाडाची) विधीवत पूजा करून साजशृंगार करतात व रात्रभर आपल्या परंपरागत कोळी नृत्यावर ताल धरतात.
पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील सर्व बंदरात मत्स्य दुष्काळाचे सावट यावर्षी अधिक गडद झाल्याने मच्छिमारांमध्ये खूप चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे त्याचा काहीसा परिणाम होळी सणावर जाणवताना दिसून येत आहे. सातपाटीमध्ये जागृती मंडळ, होळीमाता मंडळ, दांडापाडा मंडळ इ. जुनी मंडळे असून संपूर्ण गाव या मंडळामधील होलोकोत्सव साजरा करताना एकत्र जमतात. प्रथम गावाच्या बाहेरील बागायती क्षेत्रातून भेंडीच्या किंवा सुपारीच्या झाडाची निवड केली जाते. हे झाड बँड बाजाच्या तालात पुरूष मंडळी खांद्यावर उचलून नाचतगात आपापल्या मंडळाकडे नेतात.
> मासे टांगण्याची परंपरा
१ मच्छिमार समाजातील समाजबांधवांमध्ये एकोपा रहावा, तरूण-तरूणीसह नव्या पिढीमध्ये पिढीजात सुरू असलेल्या परंपरा रूजाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. सध्या बदलत्या संस्कृतीमध्ये तरूणवर्ग कोळी नृत्याचा ठेका विसरून डीजे व बँडच्या तालाकडे वळत चालला असला तरी होळीचा सण साजरा करताना मात्र जुन्या परंपरागत संस्कृतीला अजून जपत असल्याचे दिसून आले.
२किनारपट्टीवरील काही गावामध्ये आजही होळीला विविध प्रकारचे मासे टांगून ठेवले जातात. पूर्वी पापलेट, दाढा, घोळ, रावस इ. चांगल्या प्रतीचे मासे टाकून नंतर त्याचा फडशा पाडला जात असे. आता मत्स्यदुष्काळामुळे सुरमई, काही, शिंगाळा इ. दुय्यम प्रतीचे मासे टांगुन ठेवले जात असल्याचे दिसून येत आहे.