राहनाळ शाळेमध्ये केली अवगुणांची होळी; वाईट विचार जाळून टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:27 AM2020-03-08T00:27:23+5:302020-03-08T00:27:43+5:30
गोवऱ्या, सुकलेला पाला, कापूर याचा वापर, विद्यार्थ्यांचा सहभाग
आसनगाव : तालुक्यातील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत नावीन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण शनिवारी साजरा करण्यात आला. या वेळी मुलांनी वाईट सवयी, वाईट विचार कागदांवर लिहून होळीत जाळून होळी साजरी केली.
होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, तसेच होळी साजरी करताना सामाजिक भान ठेवले जात नाही. पाण्याचा अपव्यय तसेच रासायनिक मिश्रीत रंग वापरून शारीरिक इजा पोहोचवली जाते, हे होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावे, यासाठी राहनाळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आजूबाजूचा कचरा, गोवºया, कापूर, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी केली. त्यात मुलांनी आपल्या मनातील वाईट विचार जाळून टाकले. शाळेतील विद्यार्थिनी अंकिता आंबेकर, मानसी टोळे यांनी होळी पेटवली. मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांनी मुलांना होलिकेची कथा सांगितली. तसेच रासायनिक रंग वापरू नयेत, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या उपक्र माची संकल्पना राहनाळ शाळेचे शिक्षक अजय पाटील यांची होती. आठ दिवस इकोफ्रेंडली होळी कशी साजरी करावी, याबाबत त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तर शिक्षिका चित्रा पाटील, अनघा दळवी, संध्या जगताप या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाणीबचतीचे महत्त्व मुलांना पटवून देत इकोफ्रेंडली रंग कसे तयार करावेत, याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर होळीची विज्ञानाशी सांगड पटवून दिली. या वेळी शिक्षिकांनी मुलींबरोबर होळीभोवती फेर धरून होळीची गाणी म्हटली. या कार्यक्र माप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य नाईक यांनी मुलांना आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन पारंपरिक होळीचे समाजातील महत्त्व मुलांना पटवून दिले.