Holi : होळी सणावर कोरोनाचे सावट; धुळवडप्रेमींची निराशा, खडवली भातसा नदीवर शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 20:06 IST2021-03-29T20:05:13+5:302021-03-29T20:06:12+5:30
Holi: दरवर्षी खडवली रेल्वे स्थानका नजीक असलेल्या भातसा नदीवरील पिकनिक स्पॉटवर शुकशुकाट पाह्यला मिळाला.

Holi : होळी सणावर कोरोनाचे सावट; धुळवडप्रेमींची निराशा, खडवली भातसा नदीवर शुकशुकाट
- उमेश जाधव
टिटवाळा : हिंदू संस्कृतीतला महत्वाचा समजला जाणारा मोठा सण म्हणजे होळी. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी होता होता पुन्हा नव्याने जास्तीच वाढत चालला आहे. या दुसऱ्या लाटेत ठाणे जिल्ह्यासह कल्याण तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी खडवली रेल्वे स्थानका नजीक असलेल्या भातसा नदीवरील पिकनिक स्पॉटवर शुकशुकाट पाह्यला मिळाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून होळी सणांवर काही निर्बंध लादले गेल्याने परिसरात बहुतांशी ठिकाणी शुकशुकाट पाह्यला मिळाला. खडवली येथील निसर्गरम्य वातावरण आणि नदीचे वाहते निळसर स्वच्छ सुंदर पाणी मुबंई उपनगरातील पर्यटकांना भुरळ घालत असते. भातसा नदीवर धुळवड खेळून झाल्यानंतर धुळवडीचा रंग काढण्यासाठी हजारोच्या संख्येने धुळवड प्रेमी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता कहर पाहता या ठिकाणी दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त या तैनात केला होता. अशाही परिस्थितीत काहीजण नदीकडे फिरकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांकडून त्यांना सुचान देऊन परतवून लावण्यात येत होते. हे पहिलेस बर्षे असेल की धुळवडीच्या दिवशी खडवली भातसा नदितीरावर शुकशुकाट दिसून आले.
दुसरीकडे, कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्यावतीनेही काही नियमावली बनवण्यात आली आहे. जर कोणी सोसायटीच्या आवारात होळी अथवा रंग पंचमी साजरी करणार असतील तर त्यावर देखरेख ठेवण्यासाठी चार पथकांची नेमणूक महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केले जाईल. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
यंदाच्या होळी उत्सवावर कोरोनाचे विरजण पडल्याने दर वर्षी प्रमाणे यंदाचा होळी उत्सव आसून नसल्यासारखा असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी शासनाचे नियम पाळत कमी गर्दीत होळ्या पेटविण्यात आल्या. तर बच्चे कंपनीने काही प्रमाणात धुळवडीचा आनंद लुटला असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले.