मीरा-भाईंदर, वसई-विरारमध्ये होळी, धूलिवंदनावर बंदी; कोरोनाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:00 AM2021-03-26T00:00:21+5:302021-03-26T00:01:19+5:30
पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार २८ मार्च रोजी होळी, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिल रोजी होणाऱ्या रंगपंचमीच्या अनुषंगाने २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत
मीरा रोड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाने होळी व धूलिवंदनासाठी २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. नागरिकांनी घरीच सण साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार २८ मार्च रोजी होळी, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिल रोजी होणाऱ्या रंगपंचमीच्या अनुषंगाने २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी झाडे, लाकडे तोडणे व त्याचे दहन करणे, पादचाऱ्यांवर रंग, पाणी व फुगे फेकणे, पिशव्यांचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावणे, अश्लील शब्द व घोषणा देणे, विकृत हावभाव करणे आदी कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, रिसॉर्ट, सभागृहामध्ये धूलिवंदन-होळी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून पोलिसांनी मनाई आदेश लागू केले असून सण साधेपणाने घरच्या घरी साजरे करण्याचे आवाहन महानगरपालिकेसह पोलिसांनीही केले आहे. या आदेशांचे उल्लंघन करुन जमावाने होळी साजरी केल्यास गुन्हा दाखल करण्यासह कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
आवाहनाचा परिणाम
होळी, धूलिवंदन जवळ आले की दुकानांमध्ये पिचकारी, रंग यांच्या खरेदीसाठी गर्दी होते; परंतु होळीला केवळ तीन दिवस शिल्लक असले तरी दुकानांत शुकशुकाट आहे, फार कमी लोक खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यातच कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहता महानगरपालिकेने होळी घरातच साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन लोकांना केले आहे. त्याचाही परिणाम होऊन यंदा रंग, पिचकारींची विक्री अत्यल्प प्रमाणात होत असल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली.