होळीसाठी यंदाही टँकर नाहीत, नैसर्गिक पद्धतीने सण साजरा करा; ठाणे महापालिकेचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:37 AM2018-02-28T01:37:36+5:302018-02-28T13:40:07+5:30
ठाणेकरांनी होळीचा सण पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
ठाणे : ठाणेकरांनी होळीचा सण पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. होळी सणासाठी कोणत्याही परिस्थितीत पाण्याचे टँकर देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर होतो. त्यामुळे या दिवशी कोणालाही पाण्याचे टँकर न पुरविण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. तसेच शहरातील सर्व्हिस स्टेशनलाही तशा सूचना देण्याविषयी त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना निर्देशित केले आहे. ठाणे हे सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक परंपरा जपणारे शहर आहे. ही परंपरा अधिक समृद्ध आणि आरोग्यदायी व्हावी यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर करू नये, वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवू नये तसेच नैसर्गिक पद्धतीने होळी साजरी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पिशव्यांची सर्रास विक्री-
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या असल्या तरी शहराच्या विविध भागात खास करून झोपडपट्टी भागात आजही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात असून सर्रासपणे या पिशव्यी विकल्या जात असल्याचे दिसत आहे. यामुळे पालिका त्यावर कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
होळीच्या काळात पाण्याचा अधिक अपव्यय होत असतो. त्यातही मागील काही वर्षात मोठ्या रंगपंचमींच्या ठिकाणी पालिकेचे टँकर घेऊन हा सण साजरा करण्याची प्रथा होती. परंतु,मागील काही वर्षांत पावसाने पाठ फिरविल्याने टँकरच्या वापराबाबत काही दक्ष नागरिकांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर पालिकेने मागील चार वर्षांपासून ते न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदादेखील त्याच धोरणाची अंमलबजावणी केली जात असल्याचे पालिकेच्या अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे.