शिक्षकांना हवीय मतदानानंतर सुटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:44 PM2019-04-18T23:44:08+5:302019-04-19T06:42:21+5:30
मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान झाल्यानंतरही रात्री सुमारे २ वाजेपर्यंत निवडणूक कामात गुंतून राहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुस-या दिवशी सुटी देण्यात यावी,
ठाणे : मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान झाल्यानंतरही रात्री सुमारे २ वाजेपर्यंत निवडणूक कामात गुंतून राहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुस-या दिवशी सुटी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी ठाण्यासह पालघर, रायगड आदी कोकणातील जिल्ह्यांमधील शिक्षकांनी केली आहे. संबंधित माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिका-यांना याबाबत लेखी निवेदनाद्वारे साकडे घातले असल्याची माहिती ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याआधीच्या दिवसापासूनच शिक्षक व शिक्षकेतर शालेय कर्मचाºयांना निवडणूक कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी लागते. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना दिलेल्या मतदानकेंद्राचा ताबा घ्यावा लागतो. दिलेले साहित्य जबाबदारीने सांभाळत साहित्याजवळच झोपावे लागते. ही जोखमीची जबाबदारी संबंधित शिक्षक, कर्मचाºयांना दुसºया दिवसाच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत किंवा साहित्य निवडणूक आयोगाकडे जमा होईपर्यंत पार पाडावी लागते. त्यानंतर, घरी येण्यास बहुतांश शिक्षकांना ३० एप्रिलची पहाट उजाडणार आहे. त्यामुळे सतत दोन दिवस कामाचा ताण घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना ३० एप्रिल रोजी सुटी देणे क्रमप्राप्त होईल, याची शिक्षणाधिकाºयांना निवेदनाद्वारे करून दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींना निवडणुकीच्या कामासाठी, महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रांवरील कामासाठी मोठ्या प्रमाणात नेमले आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा हजार ७१५ मतदानकेंद्रांवर सुमारे ४७ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे निवडणूक यंत्रणेसाठी कामाला लागले आहेत. माध्यमिक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचा मोठ्या समावेश आहे. मतदानकेंद्रांवर दोन दिवस तणावाखाली असणाºया शिक्षकांनी सुटीची मागणी लावून धरली
आहे.