सुटीत रेल्वेचा फटका; प्रवासी फलाटावरच, पैसे परत देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:43 AM2018-04-17T02:43:38+5:302018-04-17T02:43:38+5:30
कल्याण स्थानकातून दुपारी एक वाजता सुटणारी पवन एक्स्प्रेस चार तास उशिराने आली. पण कल्याण स्थानकात उघडणारा जनरल डबाच तिला जोडलेला नसल्याने तिकीट काढून गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना गाडी सोडून देण्याची वेळ आली.
कल्याण : कल्याण स्थानकातून दुपारी एक वाजता सुटणारी पवन एक्स्प्रेस चार तास उशिराने आली. पण कल्याण स्थानकात उघडणारा जनरल डबाच तिला जोडलेला नसल्याने तिकीट काढून गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना गाडी सोडून देण्याची वेळ आली. अन्य जनरल डब्यांची दारे उघडली न गेल्याने संतापलेल्या प्रवाशांनी तिकीटाचे पैसे परत मागितले. पण ते देण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिल्याने गाडीही गेली, पैसेही गेले आणि मन:स्ताप नशिबी आल्याची संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. गाडीत चढायला जागा नसेल, जनरल डबा कल्याणला उघडणार नसेल तर तिकीटे का विकली, दरवाजे उघडतात की नाही ते पाहायला फलाटावर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान का नव्हते, असा प्रश्न विचारत तिकीट घराजवळ गाडी चुकलेल्या प्रवाशांनी एकच गर्दी केली. रेल्वेने फसवणल्याचा आरोप केला.
उल्हासनगरला राहणारे विजय सोनी त्यांच्या कुटुंबासोबत अलाहाबादला निघाले होते. त्यासाठी त्यांनी पहाटे पाच वाजता तिकीट काढले. त्यांना दुपारी एक वाजता कल्याण स्थानकातून पवन एक्स्प्रेस गाडी मिळमे अपेक्षित होते. तसे सांगूनच त्यांना तिकीट खिडकीतून हे तिकीट दिले गेले. आरक्षण नसल्याने आणि ऐनवेळी तिकीट काढल्याने जनरल डब्यातून प्रवास करावा लागणार याची त्यांना कल्पना होती. त्यानुसार त्यांना तिकीट मिळाले. त्यांनी दुपारी १२ वाजताच कल्याण स्थानक गाठले. मात्र पवन एक्सप्रेस एकऐवजी तब्बल चार तास उशिराने आली. सायंकाळी पाच वाजता गाडी कल्याण स्थानकात आली, तेव्हा त्या गाडीला कल्याण स्थानकात उघडणारा जनरल डबा लावलेला नसल्याने दिसून आले. पण हा डबा नसल्याची घोषणा होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये आधी संभ्रम होता. नंतर गोंधळ सुरू झाला. गाडीत चढता येत नसल्याने प्रवासी संतापले. तोवर गाडी निघून गेली. जवळपास ६० प्रवासी या अवस्थेत कल्याण स्थानकात अडकून पडले. त्यांनी एकत्र येत तिकीट खिडकीजवळ जाऊन तिकीटाचे पैसे परत करण्याची मागणी केली. पण त्यांच्या मागणी तेथील कर्मचाऱ्यांनी ऐकूनही घेतली नाही. दाद मिळत नसल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
साडेचार तास गाडी सायडिंगला
कुटुंबासोबत मध्य प्रदेशातील चंपारण्य येथे वल्लभाचार्यांच्या दर्शनासाठी गेलेले ९६ वर्षाचे दामूभाई ठक्कर यांनाही रेल्वेचा असाच विपरित अनुभव आला. ते समर सट्टा या एक्स्प्रेसने कल्याणला परतत होते. त्यांची गाडी इगतपुरी येथे अर्धा तास, वासिंद स्थानकात दीड तास आणि खडवली स्थानकात अडीच तास थांबवून ठेवण्यात आली. गाडीच्या रखडपट्टीमुळे त्यांचा अकारण साडेचार तासांचा प्रवास वाढला. वयोवृद्ध ठक्कर यांना रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. तसेच गाडीतील उकाड्याने त्यांची प्रकृतीही बिघडली.