गळके छप्पर, भिंतींच्या भेगांमुळे वसाहतींची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:33 AM2018-08-06T02:33:50+5:302018-08-06T02:34:40+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील भवानी निवास, जयअंबे निवास, श्री नवदुर्गा निवास, सुभाष मैदानाजवळ असलेली इंदिरानगर वसाहत, गुरूकृपा हाउसिंग सोसायटी, संतोषीमाता मंदिर रोडवरील वसाहत आणि डोंबिवलीतील नेहरू मैदानाजवळ असलेल्या हरिजन कॉलनी भागात सफाई कामगारांच्या वसाहती आहेत.

Holocaust roof, colonization due to wall collapses | गळके छप्पर, भिंतींच्या भेगांमुळे वसाहतींची दुरवस्था

गळके छप्पर, भिंतींच्या भेगांमुळे वसाहतींची दुरवस्था

Next

डोंबिवली- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील भवानी निवास, जयअंबे निवास, श्री नवदुर्गा निवास, सुभाष मैदानाजवळ असलेली इंदिरानगर वसाहत, गुरूकृपा हाउसिंग सोसायटी, संतोषीमाता मंदिर रोडवरील वसाहत आणि डोंबिवलीतील नेहरू मैदानाजवळ असलेल्या हरिजन कॉलनी भागात सफाई कामगारांच्या वसाहती आहेत. सर्वाधिक गंभीर परिस्थिती भवानी निवास वसाहतीत पाहावयास मिळते. ही वसाहत १८८५ पासून आहे. कालांतराने या वसाहतीत इमारती उभ्या राहिल्या. १९७० आणि १९७५ मध्ये झालेल्या इमारतींचे बांधकाम सद्य:स्थितीत शिकस्त झाले आहे. याठिकाणी अनुक्रमे १६ आणि २० सफाई कामगारांची कुटुंबे वास्तव्याला आहेत. छताला असलेले प्लास्टर कोसळण्याच्या घटना येथे वारंवार घडल्या आहेत. पावसात भिंती ओल धरतात. बहुतांश ठिकाणी प्लास्टर निघाल्याने भिंतींमधील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. इमारतींच्या भिंतीवर मोठमोठी झाडे उगवली आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. अग्निशमन दलाकडे तक्रार करूनही झाडे तोडली जात नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
पाण्याचे पाइपही जुने झाले असून ते गंजल्याने निरुपयोगी ठरले आहेत. घरात केवळ स्नानासाठी बाथरूम आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांची योग्य प्रकारे स्वच्छता होत नसल्याने आम्हालाच त्याची निगा राखावी लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. धोकादायक इमारतीचा भाग बाजूकडील चाळीवर तसेच घरावर कधी कोसळेल, याचा नेम नसल्याने या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. बहुतांश कुटुंबांनी स्वखर्चाने घरातील डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, पण गळती कायम राहत असल्याने परिस्थिती जैसे थे आहे. याच परिसरात श्री नवदुर्गा निवास ही वसाहत आहे. ही वसाहत १९५८ ची आहे. याठिकाणी १० कुटुंबे राहतात. घुशींनी जमीन पोखरल्याने ड्रेनेज वारंवार तुंबते. सांडपाणी काहींच्या घरातही जाते. नवदुर्गा निवाससाठी नगरसेवक निधीतून स्वच्छतागृहे बांधण्यात आली. पण, वापरण्यायोग्य नसल्याने ती निरुपयोगी ठरली आहेत. याच भागात जयअंबे निवास ही ५० खोल्यांची वसाहत आहे. याठिकाणीही गळके छप्पर आणि अन्य सुविधांची वानवा आहे. संतोषीमाता रोडवरील वसाहतीत १५ खोल्या आहेत. महापालिका मुख्यालयाजवळ असलेल्या सुभाष मैदानाला लागूनच इंदिरानगरमध्येही कामगारांची वसाहत आहे. सुमारे ४० वर्षांपासून अत्यंत दाटीवाटीत वसलेल्या या वसाहतीमधील समस्यांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याठिकाणी ४० घरे आहेत. तर, मुख्यालयाला लागूनच असलेल्या गुरूकृपा सोसायटीत ५० घरे आहेत. ही एकमेव नोंदणीकृत वसाहत आहे. याठिक ाणी मूलभूत सुविधांची वानवा नसली, तरी वाढलेल्या झाडांच्या फांद्या कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याआधीही झाडाच्या मोठ्या फांद्या पडल्याच्या घटना येथे घडल्या आहेत.
डोंबिवलीला नेहरू मैदानाजवळ कामगारांची वसाहत आहे. हरिजन कॉलनी म्हणून ओळखल्या जाणाºया वसाहतीत १२ घरांची चाळ आहे. तळमजला अधिक एक अशी इमारत येथे आहे. येथे प्लास्टर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. १९५५ पासून ही वसाहत आहे. दरम्यान, वसाहतींच्या दुरवस्थेबाबत प्रभाकर घेंगट, विनोद चव्हाण, वालजी चव्हाण, अशोक सोळंकी, वसंत सोळंकी तसेच बाबुभाया जेठवा आदी कृती समिती आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केले, पण समस्यांवर उपाययोजना करण्यासंदर्भात कोणतीही पावले उचलली जात नाहीत, अशी खंत संबंधित प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
वसाहतींचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण करण्याची मागणीही कामगारांकडून केली जात आहे. वसाहतींचे केंद्रीकरण झाले, तर रिकाम्या होणाºया भूखंडाचा वापर महापालिकेला अन्य प्रयोजनासाठी करणे सोयीचे होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पण, त्या सूचनेकडेही प्रशासनाने कानाडोळा केला. कामगारांच्या वसाहतींप्रमाणे कर्मचाºयांच्या वसाहतीकडेही दुर्लक्ष झाले आहे. रामबाग लेन या परिसरातील वसाहतीसह डोंबिवलीतील रामचंद्र टॉकीज भागातील रहिवाशांचाही जीव टांगणीला लागला आहे. रामबाग लेनमधील वसाहतीत आठ खोल्या आहेत. छतावर पत्रे टाकण्यात आले आहेत, पण त्यातून गळती होत आहे. ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या या वसाहतीत स्वच्छताही ठेवली जात नाही. देखभाल दुरुस्तीसाठी वेतनातून पैसे कापले जातात, पण सुविधा मिळत नाही. रामचंद्र टॉकीज परिसरातील वसाहतीत दोन वर्षांपूर्वी प्लास्टर कोसळल्याने पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली होती. या वसाहतींमधील जीर्ण झालेली बांधकामे जीवावर बेतू लागल्याने अनेक वसाहतींमधील कर्मचारी अन्यत्र स्वखर्चाने भाड्याने राहणे पसंत करत आहेत.
>कर्मचाºयांची आबाळ
महापालिकेचे अनेक भूखंड महसूल विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुसज्ज अशा या जागा आहेत. पोलीस विभागासाठीही जागा देण्यात आल्या आहेत. पण, आपल्या कर्मचाºयांची सुरक्षा दुरवस्थेमुळे धोक्यात आली असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. ज्या जागा इतर प्राधिकरणांसाठी देण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून भाडेही वसूल केले जात नसल्याचा मुद्दा काही महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत सदस्यांनी उपस्थित केला होता. तसेच या जागा तत्काळ ताब्यात घ्या, असे आदेशही दिले होते. पण, आजतागायत ठोस कृती झालेली नाही.
>प्रशासन दुर्घटनेची वाट बघतेय का?
कल्याण-डोंबिवली स्मार्ट करण्यासाठी पालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागात ग्रोथ सेंटर उभारण्याच्या गोष्टी सरकार एकीकडे करत आहे; पण आज शहराची जी दुरवस्था झाली, त्याकडे यंत्रणेने गांभीर्याने लक्ष दिले, तरी जनसामान्य समाधानी होतील. पालिका कर्मचाºयांच्या वसाहतींची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने वेळीच पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन नेहमीप्रमाणे जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
>अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वाºयावर
अत्यावश्यक सेवा म्हणून कर्तव्य बजावणाºया अग्निशामक दलाच्या जवानांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आधारवाडीतील मुख्य केंद्रासह ड आणि ह प्रभाग कार्यालयात पाहावयास मिळते. आधारवाडीतील मुख्य केंद्राची धोकादायक इमारत दुरुस्त करावी, यासंदर्भात दोन वर्षांपासून नगरसेवक उगले यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत कामाची फाइलही बनवण्यात आली. परंतु, निधीअभावी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तर ड प्रभाग कार्यालयाची इमारत दुरवस्थेच्या गर्तेत सापडली असताना याठिकाणी छोट्याशा खोलीत कार्यालय उघडलेल्या अग्निशमन जवानांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा अभाव, पाण्याच्या टाक्या साफ न होणे, जागेचा अभाव, चेंजिंग रूम नाही, सुटीच्या दिवशी स्वच्छतागृहांची स्वच्छता होत नाही आदी समस्यांना कामगारांना तोंड द्यावे लागत आहे. ह प्रभागातील अग्निशमन जवानांनाही जागेअभावी त्यांचे सामान खोलीच्या बाहेर ठेवावे लागते. ह प्रभागातील श्रीधर म्हात्रे चौकाच्या ठिकाणी नवीन केंद्र बांधून तयार आहे. त्याठिकाणी बेकायदा पार्किंग व्हायला सुरुवात झाली आहे.
> नव्या वास्तूंचे अस्तित्व धोक्यात
कल्याण पश्चिमेतील क प्रभाग, ब प्रभाग तर पूर्वेकडील ड प्रभाग आणि डोंबिवलीतील महापालिकेची विभागीय वास्तू ही कार्यालये अनेक वर्षांपासूनची आहेत. क प्रभागातील दुरवस्थेचे वास्तव नुकतेच प्रभाग समितीचे सभापती मोहन उगले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आणले होते. ही इमारत ४० वर्षे जुनी आहे. डागडुजीअभावी या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. धोकादायक अवस्थेत उभ्या असलेल्या या इमारतीला काही ठिकाणी तडे, भेगाही गेल्या आहेत. सभापती दालनाचे छत केव्हाही कोसळेल, अशा अवस्थेत ही इमारत उभी आहे.
दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद केली आहे; पण संबंधित निधी वापरला गेलेला नाही. डागडुजीअभावी कर्मचारी आणि येणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून इमारतीच्या दुरवस्थेचे सभापती उगले यांनी वाभाडे काढल्यानंतर प्रशासन जागे झाले. हे कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. २०१६ मध्ये उभारण्यात आलेल्या डोंबिवली ग्रामीण भागातील इ प्रभाग कार्यालयाचे पीओपी आता पडायला सुरुवात झाली आहे. हे कार्यालय खाजगी जागेवर बांधल्यावरून वाद निर्माण झाला होता.
आता याठिकाणच्या बांधकामाचे पीओपी कोसळायला सुरुवात झाल्याने, बांधकामाचा दर्जा कसा असेल, याची प्रचीती येते. डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारतही जुनी झाली आहे. याठिकाणच्या स्वच्छतागृहाला गळती लागली असून इमारतीमध्ये काही ठिकाणी प्लास्टर निघाले आहे. मध्यंतरी बांधकाम विभागाकडून डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात आली खरी; परंतु स्वच्छतागृहातील गळतीची समस्या जैसे थे राहिल्याने सांडपाण्याचा जलाभिषेक कर्मचारी आणि नागरिकांवर होत आहे. याठिकाणी असलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहातील नळ नादुरुस्त झाल्याने त्यामधून पाण्याची गळती होत आहे.
घुशी, उंदरांचा सदैव संचार असून येथील बेसिनचा पाइप कुरतडण्यात आला आहे. याच पाणीगळतीचे चित्र डोंबिवली पश्चिमेकडील ह प्रभाग कार्यालयात पाहायला मिळते. एकीकडे नागरिकांना पाण्याच्या काटकसरीचे धडे द्यायचे आणि दुसरीकडे कार्यालयात होणाºया पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष करायचे, हा विषय चर्चेचा ठरला आहे. याठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छताही होत नसल्याच्या तक्रारी कर्मचाºयांनी केल्या आहेत. कल्याण पूर्वेकडील ड प्रभाग कार्यालयात छतावर काही ठिकाणी पत्रे टाकण्यात आले आहेत. ज्याठिकाणी पत्रे नाहीत, तेथे पाणी झिरपत आहे. हे पाणी भिंतीतून आणि छतातून पडत असल्याने येथील कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत.
येथील संगणक खराब होऊ नये, म्हणून ते झाकून ठेवण्याची नामुश्की ओढावली आहे. याठिकाणी छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. यात काहीजण जखमीही झाले आहेत. हीच परिस्थिती पश्चिमेकडील ‘ब’ प्रभाग कार्यालयाची आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. आमचा जीव गेल्यावरच अधिकाºयांना जाग येणार का असा संतप्त सवालही या कर्मचाºयांनी केला आहे. घरांच्या दुरवस्थेमुळे कुटुंबही भीतीच्या छायेत राहत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Holocaust roof, colonization due to wall collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.