हाजुरी क्लस्टरमध्ये १,००१ जणांना घरकुल; ठाणे महापालिकेने संकेतस्थळावर केली प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:40 AM2020-10-16T01:40:18+5:302020-10-16T01:40:26+5:30
अंतिम यादी तयार : ठामपाने क्लस्टर योजनेसाठी पहिल्या टप्प्यात कोपरी, हाजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर, राबोडी या परिसरांची प्राधान्याने निवड केली आहे.
ठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेल्या क्लस्टर योजनेला आता पाच महिन्यांनंतर चालना मिळण्यास सुरुवात झाली आहे. आझादनगर येथील बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या हाजुरी येथील क्लस्टर योजनेतील १,००१ लाभार्थ्यांची अंतिम यादी ठामपाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
ठामपाने क्लस्टर योजनेसाठी पहिल्या टप्प्यात कोपरी, हाजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर, राबोडी या परिसरांची प्राधान्याने निवड केली आहे. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये क्रीडांगण, सांस्कृतिक केंद्र, सुरक्षा, कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाउन सेंटर अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. या परिसरातील क्लस्टर योजनेचा विकास प्रामुख्याने भूखंडधारकांच्या, भोगवटाधारकांच्या गृहनिर्माण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. येथील रहिवासी अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्य करत असले, तरीही नियमावलीत ते पात्र ठरल्यास त्यांना राहत्या घराइतके घर पुनर्विकासात मिळणार आहे. योजना ही प्रामुख्याने भूखंडधारक, भोगवटाधारकांची गृहनिर्माण संस्था यांच्यामार्फत होणार असून घरांचा ताबा त्यांना मिळणार आहे.
हरकती ऐकल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध
महापालिकेने हाजुरी येथील सर्वेक्षण पूर्ण केले असून १,००१ रहिवाशांची यादी तयार केली आहे. लाभार्थ्यांची पहिली यादी मे २०१९ मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती, सूचना घेतल्यानंतर ३० जानेवारीला अंतिम यादी करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. या अंतिम यादीला महापालिकेची मंजुरी मिळाली असून लाभार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या माहितीसाठी ती नोटीसद्वारे प्रसिद्ध केली आहे. संगणकीय प्रणालीवर प्रसिद्ध केलेली यादी ही नागरी समूह विकास योजनेकरिता अंतिम असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.