राज्यभरातील 97 हजार सेविकांना घर पोहोच आहार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 03:15 PM2020-03-26T15:15:36+5:302020-03-26T15:15:36+5:30
घरपोच आहार म्हणजे टीएचआरचा पुरवठा जिल्हा परीषद, स्थानिक प्रशासनाला ५० दिवसांसाठी मार्केटींग फेडरेशनकडून होऊ घातला असल्याचे पाटील सांगतात.
ठाणे : अंगणवाडी सेविकां आपल्या गावात गृहभेटी देऊन सर्व्हे करीत आहेत. गावात कुणी बाहेरून आला, तर त्याचे नाव व संपूर्ण माहीती स्थानिक प्रशासनापर्यंत पोचवत आहेत. बालकांना आहाराचे बंद पाकीट घरपोहोच देत आहेत. कोरोनाच्या पाश्वभूमिवर ही जोखमीची कामे राज्यभरातील 97 हजार सेविकांना करावी लागत आहेत. सध्या ठाणे, पालघर, नाशिक, सांगली, यवतमाळ आदी जिल्ह्यातील सेविकांकडून ही कामे करुन घेतली जात असल्याचे वास्तव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे येथील अँड. एम. ए. पाटील यांनी सागितले.
घरपोच आहार म्हणजे टीएचआरचा पुरवठा जिल्हा परीषद, स्थानिक प्रशासनाला ५० दिवसांसाठी मार्केटींग फेडरेशनकडून होऊ घातला असल्याचे पाटील सांगतात. हा आहार सेविकांना लाभार्थ्याचे घरी पोचवायचा आहे, मग मोबाईलला त्याची नोंद करायची आहे. आहाराची पाकिटे आल्यानंतर ती वाटायची आहेत. हे काम सुरक्षेची साधने वापरूनच करायचे आहे. पण त्यासाठी आवश्यक ती वैयक्तिक सुरक्षेची साधने, मास्क, ग्लोव्हज, गाॅगल व ओव्हरकोट शासनाने पुरवलेली नाहीत. ती फ्लेक्सी फंडातून घेण्याची नेहमीप्रमाणे सूचना दिली आहे, असे ही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सध्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 च्या साथीने संपूर्ण देश ठप्प झाला आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडी सेविकेने आपल्या सर्व्हेत कुणी बाहेरून आला, तर त्याचे नावे, माहीती स्थानिक प्रशासना पर्यंत मोबाईलची माहीती पाठवीत रहा, अंगणवाडी सेविकांचा जर कुणाला सल्ला हवा असेल तर त्यांना मोबाईलवरून तो द्यावा, स्वत:ची काळजी घ्या आदी मार्गदर्शन व आधार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून सेविकांना दिला जात आहे, असे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचे राजेश सिंह यांनी सांगितले.