घरतच्या विभागीय चौकशीचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:20 AM2019-06-21T00:20:20+5:302019-06-21T00:20:30+5:30
महासभेची मंजुरी; लाचखोरीची चौकशी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या विभागीय चौकशीचा ठराव गुरुवारी पार पडलेल्या महासभेत अखेर मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सहा महिन्यांच्या आत येणे अपेक्षित होते. मात्र, त्याला प्रशासनाकडून विलंब झाला. हा विलंब का झाला, याविषयी सदस्यांनी आयुक्तांकडे विचारणा केली. मात्र, त्यावर आयुक्तांनी काहीएक उत्तर दिले नाही.
घरत याने २७ गावांतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे कारवाई न करण्याच्या बदल्यात ४२ लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेच्या मागणीवर तडजोड करून ३५ लाख रुपये घेण्याचे ठरले. ३५ लाखांपैकी आठ लाखांची रक्कम स्वीकारताना १३ जून २०१८ रोजी घरत याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली.
१४ जून रोजी महापालिकेने घरत याला निलंबित केले. मात्र, त्याच्याविरोधात विभागीय चौकशी करण्याच्या प्रस्तावावर आयुक्त सही करत नव्हते. त्याच्याकडून जाणीवपूर्वक विलंब झाल्याचा आरोप मनसेकडून केला जात होता. आयुक्तांनी त्यावर सही केल्यावर हा प्रस्ताव गुरुवारच्या महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवला गेला. त्याला महासभेने मंजुरी दिली आहे.
यापूर्वी घरत याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीमधील उपायुक्तांनी रजेवर जाण्याचे कारण शोधत पळ काढला. त्यामुळे घरत याची विभागीय चौकशी कोण करणार, त्यासाठी उपायुक्त दर्जाचा आयुक्त महापालिकेत आहे की नाही, त्याचा अहवाल कधी महासभेसमोर ठेवला जाईल, याविषयी मनसे गटनेते मंदार हळबे यांनी प्रश्न उपस्थित केला. शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी यापूर्वी किती लाचखोर अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली आहे, त्यांच्या चौकशीचे अहवाल महासभेसमोर का ठेवले गेले नाहीत, याकडे लक्ष वेधले. शिवसेना नगरसेवक सचिन बासरे म्हणाले की, प्रशासनाकडून घरत याच्या चौकशीचा प्रस्ताव सहा महिन्यांच्या आत महासभेत येणे अपेक्षित होते. तसेच घरत याच्याविरोधात विभागीय चौकशी करण्यास मान्यता दिली जात असली, तरी त्याला सेवेत घेऊ नये, असा स्पष्ट उल्लेख ठरावात करा, अशी मागणी केली.
या चर्चेच्या वेळी घरत समर्थक सदस्यांनी चर्चेत सहभागी न होता मिठाची गुळणी धरली होती. हा विषय सभेत आला असता सुरूवातीला सभागृहात शांतता पसरली होती. त्यामुळे घरतच्या विषयावर कोणी चर्चा करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
किशोर शेळकेंना पदभार
उपसचिवपदाची परीक्षा किशोर शेळके यांनी दिली होती. सर्वाधिक गुण शेळके यांना मिळाले होते. शेळके यांचा महापालिकेच्या निवडयादीत समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या पदाला मान्यता दिलेली नव्हती.
आजच्या महासभेत शेळके यांच्या उपसचिवपदास मंजुरी दिली आहे. त्यानुुसार, उपसचिवपदी शेळके हे काम पाहणार आहेत. शेळके हे महिला बालकल्याण समितीत सचिवपदी कार्यरत होते. ते आता महापालिकेचे उपसचिव झाले आहेत.