घरचा आहार उत्तम आहार - ऋजुता
By Admin | Published: March 21, 2016 01:26 AM2016-03-21T01:26:19+5:302016-03-21T01:26:19+5:30
भात, पोळी, आमटी या आपल्या घरातील आहाराला आपण पर्याय शोधत आहोत. त्यामुळे घरच्या जेवणाची किंमत कळत नसल्याची खंत व्यक्त करून घरचा आहार
ठाणे : भात, पोळी, आमटी या आपल्या घरातील आहाराला आपण पर्याय शोधत आहोत. त्यामुळे घरच्या जेवणाची किंमत कळत नसल्याची खंत व्यक्त करून घरचा आहार हा उत्तम आहार असल्याचे आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितले.
रोटरी क्लब आॅफ ठाणेच्या वतीने शनिवारी घाणेकर नाट्यगृहात ‘रिमूव्ह दी वेस्ट टू टोन युअर वेस्ट’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. युवा पिढीमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी त्या म्हणाल्या की, अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी बसून राहू नये. हल्ली स्मार्ट फोनचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसून येत आहे. मात्र, त्याचे परिणाम घातक आहेत.
स्मार्ट फोन ठेवा दूर
स्मार्ट फोन दूर ठेवणे, हे आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. कारण, तो ज्या प्रकारे हाताळला जातो, त्याने सांध्यांवर ताण येतो. त्यामुळे फोनचा कमीतकमी वापर, हे योग्य आहे. झोपतानादेखील तो जवळ ठेवू नये. झोपण्यापूर्वी किमान एक तास फोन दूर असावा, अशी सूचनादेखील त्यांनी या वेळी केली. फळे भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजेत. त्या-त्या सिझनप्रमाणे जी फळे येतील, त्या-त्या फळांचे सेवन आरोग्यास चांगले राहील. तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, अशी गैरसमजूत आपल्याकडे असल्यामुळे त्याचा वापर आपण आहारात करीत नाही, हे सांगून त्यांनी तुपाचे फायदे सांगितले. या वेळी रोटरी क्लब आॅफ ठाणे अध्यक्ष प्रवीण नागरे उपस्थित होते.