"खारफुटीवर भराव टाकून एका दिवसात जमीन गायब", गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 03:30 PM2022-04-11T15:30:37+5:302022-04-11T15:31:16+5:30
Jitendra Awhad News: महापालिका हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत असतांना आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमुळे आणखी खबळळ उडाली आहे.
ठाणे - महापालिका हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत असतांना आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमुळे आणखी खबळळ उडाली आहे. कळव्यातील खारभुमी वरील अनाधिकृत बांधकामांवर त्वरीत कारवाई करा, आधी ११० एकर आता कागदोपत्री ७२ एकर नंतर उरेल ७ एकर असे त्यांचे ट्विट आहे. तसेच एका दिवसात येथील खारफुटी भराव टाकून कशी गायब करण्यात आली याचे फोटे देखील त्यांनी टाकल्याने या अनाधिकृत बांधकामांना आर्शिवाद कोणाचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
राज्यात जेव्हा कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळेस कळवा, खारेगाव भागातील या ७२ एकर जागेवर सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. तसेच याच ठिकाणी इनडोअर स्टेडीअम, जिल्हा परिषदेचे मुख्यालय देखील उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून बोर्डही लावण्यात आला. परंतु त्यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर या ठिकाणी बीकेसीच्या धर्तीवर कॅम्पस उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. परंतु त्याला देखील मुर्त स्वरुप आलेले नाही. तर येथील काही जागेवर निवडणुक विभागाचे कार्यालय देखील सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची चाचपणी देखील झालेली आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार तसे असले तरी देखील त्याचे काम अद्याप तेथे सुरु करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खारभूमी कळवा वरील अनधिकृत बांधकाम त्वरित कारवाई करा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 11, 2022
आधी 110 एकर आता कागदो पत्री 72 एकर ... नंतर उरेल 7 एकर
खारफुटी एका दिवसात गायब
@ThaneCityPolice
@bb_thorat pic.twitter.com/aUfaPjm5Ur
त्यामुळे आता येथे रातोरात भराव टाकून खारफुटी कोणी उध्वस्त केली असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आव्हाड यांनी टि¦ट करुन कारवाईची मागणी केली आहे. नाही तर भविष्यात येथे केवळ ७ एकर जागा शिल्लक राहिल असा इशाराही त्यांनी दिला. याठिकाणी मागील दोन वर्षापासून मैदानाच्या चौफेर बाजूने अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. परंतु त्यावर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित करीत महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यातून काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. परंतु त्यामुळे हळू हळू हे मैदानच आता गिळंकृत केले जात आहे. त्यामुळे किमान आजूबाजूच्या अनाधिकृत बांधकामांवर तरी कारवाई व्हावी अशी इच्छा आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
भराव कोणाचा आहे, हे माहित नाही. हे सरकार कडून केले जात असल्याचे सांगितले गेले आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी खुप मोठी जागा ही सरकारी आहे, जी लपवली जात आहे. त्याठिकाणी मागील दोन वर्षात पक्या चाळी बांधण्यात आलेल्या आहेत. किमान त्या चाळी तरी पाडा, अनेक वेळा महसुल अधिका:यांना सांगून देखील त्यावर काहीच कारवाई होत नाही.
(जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माणमंत्री )