ठाण्यात आता रुग्णांच्या दोन्ही हातांवर होम क्वारंटाईनचा शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:40+5:302021-04-08T04:40:40+5:30
ठाणे : होम क्वारंटाईन असताना एका हाताला शिक्का मारल्यावर त्या हाताला रूमाल गुंडाळून किंवा पॅण्टच्या खिशात तो हात घालून ...
ठाणे : होम क्वारंटाईन असताना एका हाताला शिक्का मारल्यावर त्या हाताला रूमाल गुंडाळून किंवा पॅण्टच्या खिशात तो हात घालून फिरण्याचे प्रकार ठाण्यात समोर आले. त्यातच होम क्वारंटाईन रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून आता अशा रुग्णांच्या दोन्ही हातांवर शिक्का मारण्यास सुरुवात केली आहे. यानुसार माजिवडा-मानपाडा या प्रभाग समितीअंतर्गत जवळपास एक हजार ३४० रुग्णांच्या हातांवर मंगळवारी शिक्के मारण्यात आले आहेत. ही मोहीम सर्वच प्रभाग समितीत राबविण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १०० शाईच्या बाटल्यांसह शिक्केही उपलब्ध असल्याची माहिती ठाणे महापालिका आरोग्य विभागाने दिली.
ठाणे महापालिका हद्दीत फेब्रुवारीअखेरीस रुग्णसंख्या वाढीस सुरुवात झाली, ती इतकी वेगाने वाढली की, तो आकडा एप्रिलमध्ये दिवसाला दीड हजार ते एकोणीसशेच्या घरात पोहोचला. ठाणे महापालिकेच्या घोडबंदर रोडवरील माजिवडा-मानपाडा या समितीत दिवसाला ४०० ते ६०० रुग्ण सापडत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या घडीला महापालिकेतील रुग्ण ८७ हजार २८९ इतके असून, त्यामधील ७२ हजार ८९२ रुग्णांनी उपचार घेत कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत; तर, एक हजार ४७५ जण या आजाराने दगावले असून, सक्रिय रुग्णांची संख्या ही १२ हजार ९८० इतकी आहे. त्यातील जवळपास ७० ते ८० टक्के रुग्ण हे लक्षणे नसल्याने, पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. ही संख्या मोठी असल्याने या रुग्णांना ओळखता यावे, यासाठी एका हातावर शिक्का मारण्यात येत होता. मात्र, होम क्वारंटाईन झाल्यावर १४ दिवस घरात बसत नाही. आपल्याला काहीच लक्षणे नाहीत म्हणून ही मंडळी शिक्का मारलेल्या हाताला रूमाल गुंडाळून किंवा तो हात पॅण्टच्या खिशात टाकून फिरतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. हा संसर्ग कमी करण्यासाठी ठामपा कार्यक्षेत्रातील प्रभाग समितींमध्ये लहान प्रतिबंधक क्षेत्रांची यादी तयार केली आहे. त्यातच आता महापालिका प्रशासनाने होम क्वारंटाईन रुग्णांच्या दोन्ही हाताला शिक्का मारण्यास सुरुवात केल्याने या रुग्णांना चाप बसेल. तर हे शिक्के मारण्यासाठी शाई आणि शिक्के हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
" होम क्वारंटाईन रुग्णांबाबत खबरदारी म्हणून आता ठामपा प्रशासनाने रुग्णांच्या दोन्ही हातांवर शिक्का मारण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी दिवसभरात एकट्या माजीवडा मानपाडा या प्रभाग समितींमध्ये एक हजार ३४० रुग्णांच्या दोन्ही हातांवर शिक्के मारण्यात आले आहेत. हे शिक्के नव्या रुग्णांच्या हातांवर मारण्यात येणार आहेत. हे शिक्के मारण्यासाठी शाईच्या १०० बाटल्या उपलब्ध झाल्या आहेत." - डॉ. राजू मुरुडकर, वैद्यकीय अधिकारी, ठामपा.